तीन दिवसांत पाचशे अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:30 IST2018-12-14T00:29:48+5:302018-12-14T00:30:14+5:30
झोपडपट्टीतील कारवाईमुळे नागरिक-प्रशासनात वाद

तीन दिवसांत पाचशे अतिक्रमणांवर हातोडा
महाड : महाड नगरपालिकेने गेल्या तीन दिवसांपासून राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेची गुरुवारी सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत शहरातील ५०० पेक्षा अधिक अतिक्रमणे हटविण्यात नगरपालिका प्रशासन यशस्वी झाले आहे. सर्वांचेच लक्ष लागलेल्या शिवाजी चौक झोपडपट्टीतील अतिक्रमणेही हटवण्यात आली आहेत.
मोहिमेला मंगळवारपासून महाड नगरपालिका प्रशासनाने प्रारंभ केला. महाड बाजारपेठ (म. गांधी मार्ग), छ. शिवाजी मार्ग, दस्तुरी नाका परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक परिसर, क्रांती स्तंभ (भीमनगर) परिसर, खारकांड मोहल्ला आणि शिवाजी चौक झोपडपट्टी या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी अखेरच्या दिवशी खारकांड मोहल्ला भागात, काही नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. त्यातून नगरपालिका प्रशासन आणि या नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळत या भागातील कारवाईही पूर्ण केली.
मुख्य रस्त्यावरील बांधकामे पाडली
शहरातील मुख्य रस्त्यालगतच्या गटारांवर करण्यात आलेली पायऱ्यांची आणि अन्य बांधकामे, गटारांच्या वर आलेले दुकानांचे नामफलक या कारवाईमध्ये काढून टाकले.
अनेक व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेत स्वत:च अतिक्र मणे काढून टाकल्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात कटुता, वाद निर्माण होण्याचे प्रसंग फारसे घडले नाहीत.
शिवाजी चौक झोपडपट्टीत कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, नगरपालिका प्रशासनाने कोणतीही भिडभाड न ठेवता या झोपडपट्टीतील अतिक्र मणे हटविली, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.