रस्त्यासाठी निधी मंजूर तरी काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:22 IST2018-10-18T23:21:45+5:302018-10-18T23:22:08+5:30
कर्जतमधील मुद्रे बुद्रुकमधील प्रकार : काम त्वरित करण्याची मागणी

रस्त्यासाठी निधी मंजूर तरी काम रखडले
कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीतील मौजे बुद्रुक येथील मंजूर रस्ता त्वरित सुरू करावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्याकडे केली आहे.
कर्जत मुद्रे बुद्रुक येथील रस्त्याचे काम वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झाले आहे. ४३२ मीटरच्या रस्त्याचे काँक्र ीटीकरण करण्यात येणार असून, रस्त्याच्या बाजूला गटार यासाठी ३ कोटी ६ लाख ६८ हजार २५५ रु पये मंजूर झाले आहेत. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले होते. मात्र, रस्ता नऊ मीटरचा मिळत नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढीव बांधकाम करण्यात आल्याने ठेकेदाराने सध्या रस्ता आहे तेवढाच करण्याचे काम सुरू केले होते. ग्रामस्थांनी ३ आॅक्टोबर रोजी नगरपरिषदेकडे निवेदन देऊन रस्ता नऊ मीटरचा करूनच काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर रस्त्याचे काम बंद होते.
मुद्रे येथील ग्रामस्थांनी १७ आॅक्टोबरला मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची भेट घेतली, त्या वेळी ग्रामस्थांसमवेत युवासेना जिल्हाधिकारी मयूर जोशी, शहर प्रमुख भालचंद्र जोशी, नगरसेविका सुवर्णा जोशी, नगरसेवक संतोष पाटील, मुकेश पाटील, माजी नगरसेविका वैशाली पाटील उपस्थित होते. मुख्याधिकारी कोकरे यांना दिलेल्या निवेदनात, गावातील रस्ता अनेक वर्षांपासून खडीकरणाचा होता. नगरपरिषद स्थापनेपासून प्रथमच सिमेंट काँक्र ीटचा होत आहे, गावाचा सिटी सर्व्हे झाला नाही.
सिटी सर्व्हे नसल्याने नुकसानीची भीती
वर्षोनुवर्षे आमची घरे त्या भागात आहेत. सिटी सर्व्हे झाला नसल्याने नगरपरिषदेने घरे तोडल्यास सिटी सर्व्हे करताना आमचे क्षेत्र कमी होऊन नुकसान होईल, तरी रस्ता आहे तसाच नवीन बनवावा. भूसंपादन कायद्याअंतर्गत गावठाण जागेतील घरांचा ताबा नगरपरिषदेने घेऊन रस्ता रुंदीकरण करण्यात येते; परंतु ही जागा नागरिकांच्या ताब्यात असल्याने रहिवाशांचे म्हणणे ऐकून काम करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
येत्या तीन दिवसांत या रस्त्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद