घारापुरी : समुद्राखालील चौथ्या केबलची दुरुस्त करण्यात महावितरणला यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 20:33 IST2023-09-18T20:32:45+5:302023-09-18T20:33:04+5:30
चार केबल्स पैकी दोन केबल्स न्हावाखाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्यामुळे घारापुरी बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

घारापुरी : समुद्राखालील चौथ्या केबलची दुरुस्त करण्यात महावितरणला यश
उरण : समुद्राच्या तळाखालून ७ कि. मी. केबल टाकून विद्युतीकरण करण्यात आलेल्या चौथ्या केबलची दुरुस्ती करण्यातही महावितरणला यश
आले आहे.
या चार केबल्स पैकी दोन केबल्स न्हावाखाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्यामुळे घारापुरी बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सदर वीजपुरवठा याआधीच २ फेज द्वारे चालू करण्यात आला होता. परंतु थ्री फेज वीजपुरवठा नसल्यामुळे पाणीपुरवठा करणारा विद्युत पंप बंद पडल्याने तीनही गावातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.त्यातच एकाच रंगाच्या केबल्स असल्याने दोष शोधून काढण्यात आणि सबमरीन जॉईंट मारण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.त्यातच पावसाळी, वादळी वातावरण, खवळलेला समुद्र, समुद्राचा तळामध्ये असलेला पाण्याचा दाब व पाण्याखाली वाहणारे प्रवाह यामुळे आव्हान अधिकच कठीण झाले होते. मात्र महावितरणने हे आव्हान स्वीकारले आणि ३७ दिवसांचा अथक प्रयत्नांमुळे नादुरुस्त केबल्सचा दोष काढून केबल चालू करून घारापुरी बेटावरील वीजपुरवठा तीन केबल्सवर सुरू करण्यात आला होता.
मात्र चौथ्या केबल्सची दुरुस्ती झाली नसल्याने बेटावरील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घारापुरीचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. या कामाबाबत संचालक (संचलन) संजय ताकसांडे,सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे व भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी जातीने लक्ष देऊन कामाला गती देण्यासाठी वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता (प्रभारी), श्री.सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर विभागाअंतर्गत असलेल्या भिंगारी उपविभागातील अति. कार्यकारी अभियंता देविदास बैकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी समुद्राखालील चौथ्या केबलची दुरुस्त करण्यात महावितरणला यश आले आहे . यामुळे बेटावरील वीजपुरवठा सुरळीत सुरू होणार असल्याचा दावा महावितरणने सोमवारी (१८) उशिरा दिलेल्या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातुन केला आहे.