किल्ले रायगड परिसर सुरुंग स्फोटाने हादरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:59 PM2019-04-13T23:59:35+5:302019-04-13T23:59:44+5:30

किल्ले रायगड परिसरात रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून विविध कामे नियम पायदळी तुडवून केली जात आहेत.

The fort raided the Raigad campus | किल्ले रायगड परिसर सुरुंग स्फोटाने हादरला

किल्ले रायगड परिसर सुरुंग स्फोटाने हादरला

Next

- सिकंदर अनवारे 

दासगाव : किल्ले रायगड परिसरात रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून विविध कामे नियम पायदळी तुडवून केली जात आहेत. किल्ले रायगड परिसरात असलेल्या वरंडोली आणि वाळसुरे गावच्या हद्दीत दगड खाणीच्या (क्वारी) सुरुंगस्फोटकाने गावातील घरांना तडे गेले, यामुळे या विभागातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणी महाड महसूल विभागात तक्रार दाखल होऊनही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान, स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर एकेकाळी ब्रिटिशांनी तोफगोळे आणि सुरुंगाचा मारा करून किल्ल्याचे वैभव नष्ट करून टाकले होते. मात्र, आज पुन्हा रायगड किल्ला सुरुंग स्फोटांनी हादरत आहे. किल्ले रायगड ही एक संरक्षित वास्तू असून, तो भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. कायद्यानुसार रायगडच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे उत्खनन आणि स्फोटके लावण्यास बंदी आहे. तसेच वरंडोली हे गाव इको सेंसिटिव्ह झोनमध्ये आहे. मात्र, या कायद्याची पायमल्ली करून एम. बी. पाटील या ठेकेदाराने वाळसुरे आणि वरंडोली या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात दगड खाणीचे खोदकाम सुरू केले आहे. मोठ्या प्रमाणात खडी आणि क्र श सॅण्ड निर्मितीचा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आला आहे. यासाठी लागणारा दगड जवळील खाणीतून काढण्यात येत आहे. हे दगड काढण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट (ब्लास्टिंग) केले जात आहे. या स्फोटासाठी भूगर्भात ७५ मि.मी. व्यासाचे होल मारून यामधून शक्तिशाली स्फोटकांच्या साहाय्याने स्फोट घडवून आणले जात आहेत. या स्फोटामुळे या परिसरात जमिनीला भूकंपासारखे हादरे बसत आहेत. या स्फोटांची तीव्रता एवढी प्रचंड आहे की, वाळसुरे आणि वरेकोंड ( वरंडोली ) या गावातील घरांना तडे आणि भेगा गेल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
>प्रकल्प बंद पाडण्याचा ग्रामस्थांचा इशारा
वरेकोंड ही या ठिकाणी ४० घरवस्तीची वरंडोली ग्रामपंचायतीची एक वाडी आहे. या स्फोटांमुळे येथील विकास सीताराम चव्हाण, भारती भरत निवगुणे, विठ्ठल पांडुरंग निवगुणे, अनंत सखाराम निवगुणे, भिकाराम सीताराम चव्हाण, गोपीचंद रामचंद्र निवगुणे यांच्या घरांना मोठमोठे तडे आणि भेगा पडल्या आहेत.
या प्रकरणी वरंडोली आणि वाळसुरे ग्रामपंचायतीने महाड प्रांताधिकारी, तहसीलदार यांना लेखी तक्र ार केली आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या महसूल विभागाला नागरिकांवर आलेल्या या संकटाकडे लक्ष
द्यायला वेळ नाही. तर ठेकेदाराच्या कंपनीने क्र शर प्लांटसाठी आणि उत्खननासाठी वरंडोली ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा ना हरकत दाखला घेतला नसल्याची माहिती सरपंच रामकृष्ण मोरे यांनी दिली आहे.
तर या प्रकरणी कंपनीने कोणताही पत्रव्यवहार केला नसून खात्याकडून सर्व्हेही झाला नसल्याचे या विभागाचे तलाठी उमप यांनी सांगितले आहे. प्रशासनाने लवकरच हे स्फोट आणि उत्खनन बंद केले नाही तर आम्ही ग्रामस्थ मिळून हा प्रकल्प बंद पाडू, असा इशारा वरेकोंड ग्रामस्थांनी दिला आहे.
>हे दगड खाणीस आणि क्र श प्लांटला वाळसुरे ग्रामपंचायतीने ना हरकत परवानगी दिली. ही ना हरकत सदर कंपनीस अटी-शर्तीस आधीन राहून दिली आहे. मात्र, जर अटी- शर्तींचे उल्लंघन झाले असेल तर परवानगी रद्द करण्यात येईल.
- डी. एस. अंभोरे, ग्रामसेवक, वाळसुरे
वाळसुरे या गावच्या हद्दीमधील दगड खाणीला दोन हजार ब्रास उत्खनानची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, स्फोटकांची तीव्रता जर जास्त असेल आणि त्यामुळे स्थानिकांच्या घरांचे नुकसान होत असेल तर या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
- विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी

Web Title: The fort raided the Raigad campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthquakeभूकंप