खासगी बस लुटणारे पाच जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 01:52 IST2020-08-17T01:52:29+5:302020-08-17T01:52:35+5:30
या घटनेतील पाच संशयितांना मेटतळे ग्रामस्थांच्या मदतीने महाबळेश्वर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

खासगी बस लुटणारे पाच जण अटकेत
पोलादपूर : विरार ते गुहागर अशी प्रवासी वाहतूक करणारी पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (क्र. एम.एच ९४७३) गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेतील पाच संशयितांना मेटतळे ग्रामस्थांच्या मदतीने महाबळेश्वर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलादपूर पोलीस बुधवारपासून कशेडी व आंबेनळी जंगलात कसून शोध घेत असताना, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी महाबळेश्वर पोलिसांना या फरारी आरोपींबाबत माहिती दिली. पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव पोलीस हवालदार दीपक जाधव, आशिष नटे, रूपेश पवार यांनी आरोपींच्या मागावर असतानाच, महाबळेश्वर पोलिसांनी मेटतळ ग्रामस्थांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले.
संतोष पवार, दत्ता शिंदे, उत्तम सुंदर शिंदे, अनिल लालासाहेब शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे असून, आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. एका प्रवाशाला कोणी डाव्या बाजूच्या डिकीतील प्रवाशांचे सामान काढून रस्त्यावर टाकत असून, अन्य व्यक्ती उचलून नेत असल्याचे दिसून आले. यावेळी या प्रवाशाने लक्झरी चालकाला ही घटना सांगून बस थांबवायला लावली. त्यावेळी मागील वाहनांतून हे सामान गोळा करून काही व्यक्ती पसार झाल्या. या गुन्ह्यात संशयित आरोपींनी आठ प्रवाशांचे सुमारे २४ हजार ५०० रुपये किमतीचे घरगुती वापराचे कपडे, चीजवस्तू, रोख रक्कम, तसेच गणपतीच्या डेकोरेशनचे सामान असलेल्या बॅगा चोरून नेल्या होत्या. या घटनेतील संशयित पसार झाले होते. मात्र, हे चोरटे शुक्रवारी सायंकाळी आंबेनळी घाटातून महाबळेश्वरच्या दिशेने एका वाहनातून निघाले होते. आंबेनळीच्या चेकपोस्टवर पोलीस बंदोबस्त पाहून त्यांनी त्यांचे वाहन रस्त्यातच सोडले. त्यानंतर, ते सर्वजण घाटातील आडवाटेने पुन्हा रस्त्यावर येत महाबळेश्वरच्या दिशेने निघाले. मेटतळे गावच्या हद्दीत आल्यानंतर ग्रामस्थांना त्यांचा संशय आला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती महाबळेश्वर पोलिसांना दिली. धडक कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. चौघांना मेटतळे हद्दीत तर एकाला लॉडविक पॉइंटच्या जवळ ताब्यात घेतले.
>पोलीस कोठडी
या प्रकरणी या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, मंगळवारपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. यातील एक अल्पवयीन आरोपीला त्यांच्या नातेवाइकाच्या ताब्यात देण्यात आले आहे, तसेच उर्वरित दोन आरोपींचा पोलादपूर पोलीस कसून शोध घेत आहेत. याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव अधिक तपास करीत आहेत.