हवामान विभागाच्या यंत्रणेचा मालवणात मच्छिमारांना फटका
By Admin | Updated: October 27, 2014 00:01 IST2014-10-26T23:35:10+5:302014-10-27T00:01:56+5:30
वीज वाहिन्यांकडे संबंधितांचे दुर्लक्ष

हवामान विभागाच्या यंत्रणेचा मालवणात मच्छिमारांना फटका
मालवण : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा तडाखा बसला. परंतु याबाबतची आगाऊ सूचना देण्यात हवामान विभागाची यंत्रणा अपयशी ठरली आहे. यामुळे मासेमारीस गेलेल्या मच्छिमारांना फटका बसला. मालवण किनारपट्टीवरील तळाशिल येथील मच्छिमार रात्री उशिरा किनाऱ्यावर परतले तर मालवणच्या पालखी सोहळ्यानिमित्त सज्ज राहिलेल्या व्यापाऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला.
गेल्या दोन दिवसांपासून गोवा किनारपट्टीवर जोराने वाहणारे वारे सायंकाळी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर थडकले. मात्र, या वादळी हवामानाची पूर्वसूचना हवामान विभागाकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे देवगड व मालवण तालुक्यातील मच्छिमार सायंकाळी मासेमारीस गेले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मालवण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा झाला. वाऱ्याचा जोर पाहून किनाऱ्यावर नांगरलेल्या नौकांना आणखी एक नांगर लावण्यासाठी स्थानिकांची धावपळ सुरु झाली. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील बंदर विभागाशी मागील दोन दिवसांतील हवामानाबद्दल विचारले असता त्यांनी शुक्रवारच्या वादळी हवामानाबद्दल आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असे सांगितले.
शनिवारी मात्र बंदर विभागाला येत्या ४८ तासात अतिवृष्टी होणार असल्याचा संदेश देण्यात आला होता. हवामान खात्याच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
वीज वाहिन्यांकडे
संबंधितांचे दुर्लक्ष
वादळी हवामानाची पूर्वसूचना देण्यासाठीची यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच शासनाने मोबाईल सेवेचाही विस्तार करावा, अशी मागणी मच्छिमारांमधून होत आहे. कुडाळ येथून मालवण तालुक्याला वीज पुरवठा केला जातो. गेली कित्येक वर्षे कुडाळ येथून मालवणला येणाऱ्या वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीकडे नीट लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे वादळी हवामानानंतर वीजपुरवठा खंडित होत राहतो.