मुरूडमध्ये ‘त्या’ फळविक्रेत्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:32 IST2021-02-23T23:32:48+5:302021-02-23T23:32:48+5:30
फळे खाल्ल्याच्या रागातून गायीच्या पोटावर वार : दंगल नियंत्रण पथकाकडून संचलन

मुरूडमध्ये ‘त्या’ फळविक्रेत्यावर गुन्हा दाखल
आगरदांडा : मुरुड शहरात एका फळ विक्रेत्याने गायीने फळे खाल्ल्याचा राग आल्याने तिच्या पोटावर चाकूने वार केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी आरोपीवर रीतसर गुन्हा दाखल केला आहे. पण या घटनेमुळे मुरुड शहरातील वातावरण तंग झाले होते.
लोकांनी शांत राहावे व दैनंदिन व्यवहार शांततेत पार पडावे यासाठी मंगळवारी मुरुड शहरात जिल्हा पोलीस उपअधीक्षक-सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दंगल नियंत्रण पथकाकडून संचलन करण्यात आले. जिल्हा पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी सांगितले की मुरुडमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी जनतेला कोणाची भीती वाटू नये सामान्य लोकांनी भयमुक्त जीवन जगण्यासाठी दंगा काबू पथक यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.
भाजी व फळ विक्रेत्यांनी रस्त्याच्या बाजूला राहून आपला व्यवसाय करीत असताना कोणत्याही पाळीव प्राण्यावर हल्ला करू नये, कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुरुड शहरातील बाजारपेठ व अन्य भागात पोलिसांचे संचलन करण्यात आले.