हवामान बदलामुळे शेतकरी मेटाकुटीला; पावसाने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 10:44 PM2019-10-31T22:44:19+5:302019-10-31T22:45:03+5:30

नैसर्गिक संकटाचा मारा, जंगलीप्राण्यांचा त्रास

Farmers Metacuti Due to Climate Change; Large crop loss due to rainfall | हवामान बदलामुळे शेतकरी मेटाकुटीला; पावसाने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान

हवामान बदलामुळे शेतकरी मेटाकुटीला; पावसाने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान

Next

संतोष सापते/दत्ता म्हात्रे 

श्रीवर्धन : कोकणातील शेती मुख्यत्वे मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. चालू वर्षी एक महिना उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने नोव्हेंबर उजाडण्याच्या मार्गावर असतानासुद्धा काढता पाय घेतला नाही, त्याचे परिणाम शेतकऱ्यांच्या भातपिकावर झाला आहे. नोव्हेंबर हा सुगीचा कालावधी मानला जातो. भातपिकाच्या ओंब्यामध्ये तांदूळ परिपक्व बनतो व आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात भात कापणीस सुरुवात केली जाते. मात्र, या वर्षी हवामान बदलामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अवकाळी पाऊस व जंगली जनावरे यांनी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे क्यार चक्रिवादळात रूपांतर झाले. त्याचे परिणाम स्वरूप समुद्रकिनारी भागात पाऊस पडला. त्यामुळे उभे असलेली पिके जमीनदोस्त झाली. डोंगराळ भागातील शेतात पाणी साचले. अनेक ठिकाणी भातपीक पाण्यात सडल्याचे निदर्शनास येत आहे. श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील भातशेतीला काही ठिकाणी करपा रोगाची लागण झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत होते. त्यात क्यार वादळामुळे पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अपेक्षित पीक हाताला लागण्याची शक्यता कमी झाली आहे; त्यात पावसाचा फटका बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

करपा रोग, पाऊस या नैसर्गिक आपत्तींना तोंड देणाºया शेतकºयाला जंगली जनावरांपासून आपले पीक वाचण्यासाठी रात्रभर जागता पहारा द्यावा लागत आहे. रानडुकरे, वानरे व रानगवे यापासून शेतीचे रक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना व युक्तींचा वापर करताना दिसत आहे. मानवी प्रतिकृती असलेल्या बुजगावण्याची निर्मिती प्रत्येक शेतात झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी शेतात झोपण्यासाठी मचाणाची निर्मिती शेतकºयांनी केल्याचे दिसून येते. या वर्षी भातपिकांची पावसामुळे नासाडी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकºयांकडून होत असून पीक विमा योजनेनुसार आर्थिक फायदा मिळावा, अशी अपेक्षा आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील शेतकºयांची या वर्षीची अवस्था अतिशय बिकट आहे, त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा व सर्व शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच त्यांच्या शेतीस उभारी घेण्यासाठी योग्य मदत करावी. - वसंत यादव, सरचिटणीस, शेकाप-श्रीवर्धन

आमच्या गावातील अनेक लोकांची भातपिके वाया गेली आहेत. लोकांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. सरकारकडून मदत व्हावी, अशी अपेक्षा आहे. - अनसूया पवार, कारविणे, शेतकरी

क्यार वादळात शेतीचे नुकसान झाले आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व सर्व तहसीलदारांना तत्काळ पंचनामे करून शेतकºयांना योग्य प्रकारे साहाय्य करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. - अदिती तटकरे,
आमदार, श्रीवर्धन

१) पेण : खरीप हंगामातील भातशेतीची पावसाने पुरती विल्हेवाट लावली असून, आता भातशेती उत्पन्नाची ठोस हमी शेतकºयांना मिळेल असे वाटत नाही. महिनाभर शेतात उभ्या भातपिकांची आता कापणी, बांधणी, मळणी या अखेरच्या टप्प्यावरचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. मात्र, शेतकाम मजुरीचे दर प्रति मजूर ५०० रुपये असल्याने शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाचे अवेळी पडणे, शेतीचे ऐन दिवाळीत निघालेले दिवाळे, शेतीच्या उत्पन्नातून मिळणारे आर्थिक उत्पन्न तुटपुंजा स्वरूपातील अशा परिस्थितीत मंजुरीचे दर भरमसाठ वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. काय करावे? काय करू नये? अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी आहे.

२) यंदाच्या खरीप हंगामात चांगला पाऊस झाला. गेल्या १५ वर्षांपूर्वी असा पाऊस पडला; पण तो दिवाळी सणांपर्यंत कधीच मुक्कामी राहिला नव्हता. यंदा सरासरी अडीच पटीने जास्त पावसाची नोंद झाली आहे. ३२०० मिलिमीटर दरवर्षी सरासरी टक्के वारी गाठणारा पाऊस ६,८०० मिलिमीटर पडला आणि पडत आहे. नोव्हेंबर महिना उजाडला तरीही आकाशात दर दिवशी मळभ दाटून येते. कापणीची कालमर्यादा उलटून गेली तरीही पाऊस शेतकºयांची पाठ सोडत नाही. शेतात ज्या काही प्रमाणात शेषबाकी आहे ते घरात नेण्यासाठी त्याची धावपळ सुरू झाली आहे. अशातच कापणी, बांधणी, मळणी सुगीसाठी मजूर बाहेरून आणावे लागतात.

३) पूर्वी अख्खे गाव अन् गावातील माणसे सुगी सुरू झाली की, शिवार माणसांच्या रेलचेलीने भरून जायचे. ग्रामीण संस्कृतीचा हा बाज होता. मात्र, विज्ञान-तंत्रज्ञान, माहिती प्रसारण युगात ही ग्रामसंस्कृती हळूहळू लोप पावली. लेकी, लेक, सुना शिकल्या, त्यामुळे शेतातील कामे करण्यात त्यांना रुची राहिली नाही. घरची माणसेच शेतीकामापासून दुरावल्याने शेतीच्या कामांसाठी मजूर आणल्याशिवाय शेतकरी बांधवांसमोर दुसरा पर्याय नसतो. पावसाने शेतकºयांचे आर्थिक गणितच बिघडवून टाकलेय. आलेल्या परिस्थितीला सामोरे जात आता कडाडले मजुरीचे दर सहन करत गेले दोन दिवस शेतकरी मजूर कापणीसाठी शेतामध्ये नेत असताना दिसत आहेत.

शेतमजुरांना सुगीचे दिवस
सध्या पेण ग्रामीण भागात कापणीचा हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकरी बांधवांना आदिवासी, कातकरी, ठाकूर समाजाचे कामगार आणण्यासाठी पेण शहरात पहाटे ५ वाजता यावे लागत आहे. डोंगराळ भागातील आदिवासी, कातकरी, ठाकूर समाजाच्या मजुरांना या सुगीत सोन्याचे दिवस आले आहेत. येत्या महिनाभर त्यांना हा रोजगार व पोटभरून चमचमीत जेवण, चहा, नाष्टा आणि येण्या-जाण्याचा प्रवास खर्च मिळणार त्यामुळे बळीराजाच्या राज्यात कामगार सुखी आहे. यामुळे सुगीच्या दिवसात मजुरांची चांदी सुरू आहे.

Web Title: Farmers Metacuti Due to Climate Change; Large crop loss due to rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.