फरार पोलीस नाईक वैभव हाके महाड शहर पोलीस ठाण्यात शरण
By Admin | Updated: May 11, 2017 02:07 IST2017-05-11T02:07:58+5:302017-05-11T02:07:58+5:30
लाचेच्या रकमेसह फरार झालेला पोलीस नाईक वैभव हाके याने बुधवारी महाड शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

फरार पोलीस नाईक वैभव हाके महाड शहर पोलीस ठाण्यात शरण
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : लाचेच्या रकमेसह फरार झालेला पोलीस नाईक वैभव हाके याने बुधवारी महाड शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड युनिटने, महाड शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे याला बारा हजार रु पयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यावेळेस झालेल्या झटापटीत गावडेचा साथीदार पोलीस नाईक वैभव हाके टेबलवर ठेवलेली बारा हजार रुपयांची रक्कम घेऊन पसार झाला होता.
गेल्या पाच दिवसांपासून फरार असलेल्या वैभव हाके याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्याच्यासमोर शरण येण्याखेरीज पर्याय नव्हता. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता वैभव हाके महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महाड येथे येऊन ताब्यात घेतले. दरम्यान, या लाच प्रकरणातील मुख्य आरोपी कुंदन गावडे याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर जामीन मंजूर झाला आहे.