फणसाड अभयारण्यात वन्यजीवांसाठी मुबलक पाणी, तलावांची स्वच्छता : सोलर पंपची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:13 IST2018-04-19T01:13:27+5:302018-04-19T01:13:27+5:30
मुबलक पाण्याची सोय असल्याने जंगलातील प्राणी शक्यतो बाहेर जाणार नाहीत

फणसाड अभयारण्यात वन्यजीवांसाठी मुबलक पाणी, तलावांची स्वच्छता : सोलर पंपची व्यवस्था
आगरदांडा : मुरुड तालुक्यात सध्या कडक उन्हाळा सुरू असून, पाण्याची टंचाई जाणवत आहे. माणसांबरोबरच वन्यजीवांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मात्र, यंदा फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांसाठी मुबलक पाणी मिळेल, असा विश्वास वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
फणसाड अभयारण्यात पाण्याचे २७ नैसर्गिक स्रोत आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणीही वन्यजीवांना पाणी मिळावे, यासाठी सावरट तलाव, बशी तलाव निर्माण करण्यात आले आहेत. अभयारण्यातील काही ठिकाणी सोलर पंप लावण्यात आले असून, बोअरिंग पंपही बसवण्यात आले आहेत. वन्यपशूंना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी दर १५ दिवसांनी तलावांची स्वच्छता करण्यात येत आहे.
मुबलक पाण्याची सोय असल्याने जंगलातील प्राणी शक्यतो बाहेर जाणार नाहीत, अशी शक्यता सुलोमान तडवी यांनी व्यक्त केली.
मुबलक पाणीसाठा असल्याने यंदा वन्यजीवांचे स्थलांतर थांबेल, त्यांची संख्या वाढल्यास पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास वनविभागाकडून वर्तवण्यात येत आहे.