दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या साइडपट्टीवर खोदकाम करून एका मोबाइल कंपनीकडून केबल टाकण्याचे काम गेली अनेक दिवसांपासून सुरू आहे. भविष्यात महामार्गाच्या रुंदीकरणात याचा अडथळा निर्माण होऊ शकतो हे माहीत असूनही खोदकामास परवानगी देण्यात आली आहे. या खोदकामामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. केबल टाकण्यासाठी महामार्गावरील साइडपट्टीवरही खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात अनेक दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. महामार्गावर अपघातांचा धोका लक्षात घेवून महामार्ग पोलीस आणि महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे काम बंद पाडले आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यानुसार येत्या काही महिन्यात इंदापूर ते कशेडी दरम्यान चौपदीकरणाचे काम सुरू होणार आहे. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना शेतजमीन अधिग्रहणाच्या नोटिसाही जारी करण्यात आल्या आहेत. महामार्गाच्या मध्यापासून ३० मीटरपर्यंतच्या जागेचे अधिग्रहण केले जात आहे. त्यामुळे महामार्गालगत नवीन बांधकामांना परवानगीकरिता ना हरकत देण्यास महामार्ग विभागाने बंदी केली आहे. असे असताना महाड तालुका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गालगत एका कंपनीचे ओ.एफ.सी. केबल टाकण्याचे काम सुरू आहे. नवीन कामाला परवानगी नसल्याने दुरुस्तीच्या नावाखाली ही नवीन केबल टाकण्याचे उद्योग कंपन्यांमार्फत केले जात आहे. वारंवार खोदकाम होत असल्याने महामार्गावर दगड, माती येते यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.मुंबई-गोवा महामार्ग हा मुळातच अरुंद मार्ग आहे. अवजड आणि प्रमाणापेक्षा अधिक मोठ्या वाहनांची वाहतूक या मार्गावरून होत असल्याने साइडपट्ट्यांची दुरवस्था झाली आहे.
खोदकामामुळे महामार्गावर अपघात !
By admin | Updated: August 7, 2015 23:09 IST