महाडमध्ये रोज एक लाख लिटर पाण्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 02:01 IST2016-06-17T02:01:44+5:302016-06-17T02:01:44+5:30

महाड शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाण्याचा साठा पूर्णपणे संपुष्टात आल्यामुळे शहरवासीयांना अनेक वर्षांनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून

Every month, one lakh liters of water sold in Mahad | महाडमध्ये रोज एक लाख लिटर पाण्याची विक्री

महाडमध्ये रोज एक लाख लिटर पाण्याची विक्री

महाड : महाड शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाण्याचा साठा पूर्णपणे संपुष्टात आल्यामुळे शहरवासीयांना अनेक वर्षांनंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून या टंचाईग्रस्त परिसरात नगरपरिषद प्रशासनातर्फे टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आरओ वॉटरला अर्थात प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या जार्सला शहरात वाढती मागणी असल्याचे दिसून येत आहे. सध्या दररोज एक लाख लिटर्सहून अधिक पाण्याची विक्री या आरओ वॉटर ट्रिटमेंट प्लांट चालकांकडून केली जात आहे.
रिवर्स अ‍ॅक्वासिफ अल्ट्राव्हायलेट कार्बन आणि सँड फिल्टर केलेले पाणी शुद्ध असल्याचा दावा या जलशुद्धीकरण प्रक्रिया करणाऱ्या युनिट चालकांकडून केला जात आहे. औद्योगिक क्षेत्र परिसरात आसनपोई गावात दोन तर तालुक्यात अन्य दोन ठिकाणी असे चार युनिट सध्या कार्यरत आहेत. माणगावमधूनही आरओ वॉटर मागविले जात आहे. तीस ते चाळीस रुपयांना वीस लिटरचे जार्स उपलब्ध असून या पाण्याची घरपोच सेवा केली जात आहे. मात्र महाड शहरात पाऊस पडेपर्यंत या पाण्याला वाढती मागणी लक्षात आल्याने त्या संधीचा फायदा हे युनिट चालक घेत आहेत. ३० ते ६० रु. ला विकले जाणारे हे आरओ वॉटरचे जार्स सध्या पन्नास रुपयांना विकले जात असल्याचे दिसून येत आहे.
नाईलाजास्तव हे शुद्ध पाण्याचे जार्स विकत घेण्यावर नागरिकांचा भर असल्याचे दिसून येत आहे. मात्र दररोज हे विकतचे पाणी घेणे परवडणारे नसल्याने सामान्य नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. (वार्ताहर)

पाणीटंचाईपासून सुटका होण्यासाठी शहरवासीयांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सक्षम आहे. शहरात सध्या चार खासगी टँकरद्वारे तसेच एक नगरपरिषदेच्या अग्निशमनद्वारे टंचाई निर्माण झालेल्या भागात पाण्याचा पुरवठा केला जात असून गरज भासल्यास आणखी टँकर वाढवण्यात येतील.
- महमदअली पल्लवकर, नगराध्यक्ष, महाड

Web Title: Every month, one lakh liters of water sold in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.