स्वॅब टेस्टच ठरणार एन्ट्री पास; पालकमंत्र्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 01:51 AM2020-08-11T01:51:54+5:302020-08-11T01:52:08+5:30

रायगड जिल्ह्यात १२ ऑगस्टनंतर येणाऱ्यांसाठी नियम लागू

Entry pass will be swab test only; Guardian Information | स्वॅब टेस्टच ठरणार एन्ट्री पास; पालकमंत्र्यांची माहिती

स्वॅब टेस्टच ठरणार एन्ट्री पास; पालकमंत्र्यांची माहिती

Next

रायगड : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यात यायचे असेल, तर स्वॅब टेस्ट करणे अनिवार्य आहे. १२ आॅगस्टनंतर येणाऱ्यांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे, तसेच क्वारंटाइनचा कालावधी हा १० दिवसांवर आणण्यात आला असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. जिल्हा शांतता समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. त्यानंतर, पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. कामानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक हे मुंबई-पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, गणेशोत्सवासाठी ते रायगड जिल्ह्यातील मूळ गावी परत येतात. सर्वत्र कोरानाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. मुंबई-पुणे या ठिकाणीही कोरोनाचा प्रभाव आहे. याच परिस्थितीमध्ये सण, उत्सव साजरे करावे लागत आहेत, परंतु बाहेरून जिल्ह्यात येणाºयांपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. यावर उपाययोजना म्हणून सरकार आणि प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, असे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यात चाकरमान्यांना यायचे असेल, तर त्यांनी १२ आॅगस्टपूर्वी येणे बंधनकारक आहे. त्यानंतर, येणाºयांकडे कोरोना स्वॅब टेस्ट केल्याचा रिपोर्ट असल्याशिवाय त्यांना ई-पास मिळणार नाही. रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल, तर त्यांना ई-पास मिळणारच नाही. क्वारंटाइनची मर्यादा आधी १४ दिवसांची होती. मात्र, रायगड जिल्ह्यासाठी आता १० दिवसांची करण्यात आली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

गणेशोत्सव साजरा करताना सरकार आणि प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. गणेश आगमनाच्या वेळी आणि गणेश विसर्जनाच्या वेळी कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही, तसेच लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. गणेशभक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करू नये, असेही आवाहन तटकरे यांनी केले.

जिल्ह्यातच कोरोनाची चाचणी
कोरोनाच्या चाचणीसाठी अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात मंजूर झालेली प्रयोग शाळा २० आॅगस्टपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यातच कोरोनाची चाचणी करणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

कोकणात येण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यांचे बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव आणि वीर स्थानकावर या रेल्वे गाड्यांचा थांबा असणार आहे. त्यामुळे खराब रस्त्यावरून प्रवास टळणार आहे.

समाजोपयोगी कार्यक्रम करावेत
गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे यांच्यावर मंडळांनी मोठ्या प्रमाणात खर्च करू नये. त्या बदल्यात आरोग्य शिबिरांसारखे समाजोपयोगी कार्यक्रम करावेत, असेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांच्या निवडीबाबत कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महामार्गावरील खड्डे भरण्याबाबत ठकेदारांना सूचना : जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. मध्यंतरी खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, पावसामध्ये पुन्हा खड्डे पडले आहेत. संबंधित ठकेदारांना खड्डे भरण्याबाबत सूचना देण्यात आल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

Web Title: Entry pass will be swab test only; Guardian Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.