Diveagar was visited by ten thousand tourists | दिवेआगरला दहा हजार पर्यटकांनी दिली भेट, व्यावसायिक सुखावले

दिवेआगरला दहा हजार पर्यटकांनी दिली भेट, व्यावसायिक सुखावले

गणेश प्रभाळे

दिघी : प्रत्येक विकेंडला कोकणातल्या पर्यटन ठिकाणी हमखास गर्दी पाहायला मिळतेच. मात्र, आठ महिन्यांच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या पर्यटनाला या विकेंडला शनिवारपासून पहिल्या दिवशी जवळपास १० हजार पर्यटकांनी दिवेआगरला भेट दिली जी आजवरची सर्वांत उच्चांकी संख्या ठरत आहे

श्रीवर्धन तालुक्यात पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत. विशेषतः येथील समुद्रकिनारे सुरक्षेच्या दृष्टीने नावाजलेले आहेत. पर्यटनाच्या मूलभूत सुविधांमध्ये प्रसिद्ध असणारे दिवेआगर येथे येण्याची पर्यटकाला उत्सुकता असते. मात्र, दिवाळीनंतर या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली असल्याचे येथील व्यावसायिक सांगतात. कोरोनामुळे विविध कारणांसाठी लांबलेल्या पर्यटकांची या वेळी हाऊसफुल गर्दी झाल्याने ५००च्या जवळपास मोठ्या हॉटेल्ससह स्थानिक घरघुती निवास बुकिंग फुल झाल्याची माहिती मिळत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे तांब्याच्या पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडल्याने ह्या स्थानास धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारी जवळ असलेले श्री रूपनारायण मंदिर हेदेखील दर्शनीय आहे. येथील स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. येणारे पर्यटक आपले कुटुंबीय तसेच मित्रपरिवारासह पाण्यात मनसोक्‍त डुंबण्याची मजाही बिनधास्तपणे लुटताना दिसतात. या विकेंडला सायंकाळच्या वेळी येथील किनारा गर्दीने फुलून गेलेला आहे. जवळपास १० हजारांहून अधिक पर्यटक येथे भेट देत असल्याचे कळाले. पर्यटकांच्या रेलचेलीने येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.

पर्यटनाला अनपेक्षित प्रतिसाद
दिवेआगर पर्यटनाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात झाली असली तरी दिवाळी हंगामात पर्यटकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.. पर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठ्या हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे. यापुढे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची ही रेलचेल नववर्षाच्या स्वागतासाठी अशीच कायम राहणार आहे. दिवाळीनंतर पर्यटकांमध्ये वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट्सदेखील सुरू करता आले, असे काही व्यवसायिकांनी सांगितले. 

Web Title: Diveagar was visited by ten thousand tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.