दिशादर्शक नसल्याने प्रवासी बोटींची चुकते वाट; मोरा, रेवस बंदरांत बोट गाळात रुतण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 07:22 IST2024-12-28T07:22:10+5:302024-12-28T07:22:19+5:30
नाविकांना धुक्यामुळे बोटी भरकटण्याची भीती

दिशादर्शक नसल्याने प्रवासी बोटींची चुकते वाट; मोरा, रेवस बंदरांत बोट गाळात रुतण्याची भीती
मधुकर ठाकूर
उरण : मोरा, रेवस सागरी मार्गावरील दिशादर्शक सिग्नल यंत्रणा मागील अनेक वर्षांपासून ठप्प आहे. त्यातच सकाळपासूनच धुके पसरलेले असल्याने या मार्गावर प्रवासी बोटी भरकटतात. त्यामुळे मुंबई जलवाहतूक संस्थेकडून दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
मोरा आणि रेवस मार्गांवर दररोज हजारो प्रवासी करतात. या सागरी मार्गावरून भाऊचा धक्का, मुंबई येथून मुंबई जलवाहतूक संस्थेच्या लाँचेस प्रवासी वाहतूक करत आहेत. याआधी मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांच्या दरम्यान दिशादर्शक सिग्नल यंत्रणा कार्यरत होती. समुद्रातच लाल आणि हिरव्या रंगाचे दिवे असलेले सिग्नल देण्यात येत होते. त्यामुळे प्रवासी बोटी बिनदिक्कतपणे योग्य दिशेने अचूक मार्गाक्रमण करीत असत.
नाविकांना धुक्यामुळे बोटी भरकटण्याची भीती
मागील काही वर्षांपासून मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांतून दिशादर्शक सिग्नल यंत्रणा बंद पडली आहे.
सकाळी पडणारे दाट धुके व रात्रीच्या प्रवासात प्रवासी वाहतूक करणाऱ्या लाँचेसच्या नाविकांना बंदरांचा अंदाज येत नाही.
या दोन्ही बंदरांतून प्रवासी वाहतूक करताना प्रवासी लाँचेस दिशादर्शक नसल्याने भरकटतात किंवा नेमक्या मार्गाचा अंदाज येत नसल्याने गाळात रूतून बसतात.
प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे
मोरा बंदरातील दिशादर्शक यंत्रणा कार्यान्वित असल्याचा दावा करतानाच स्वच्छतागृहांबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली.
नाविक दिशादर्शक सिग्नलचा व साचलेल्या गाळाचा अंदाज घेऊन बंदरात प्रवाशांना घेऊन पोहोचत असत. शिवाय मोरा आणि रेवस बंदरांतील जेट्टीवर उंच ठिकाणी लाल दिव्यांच्या सिग्नलची व्यवस्थाही केली जात होती.
बंदर विभागाचे दुर्लक्ष
दोन्ही बंदरांतील चॅनल आणि जेट्टीवर दिशादर्शक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी सातत्याने बंदर विभागाकडे केली जात आहे.
मात्र, अधिकारी त्याकडे दुर्लक्षच करत असल्याची खंत मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव शराफत मुकादम यांनी व्यक्त केली.
कदाचित अधिकारी एखाद्या दुर्घटना घडण्याची वाट पाहत असावेत, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. मोरा आणि रेवस या दोन्ही बंदरांत स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही.
त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषत: महिलांची कुचंबणा होत असल्याच्या समस्येकडेही शराफत मुकादम यांनी लक्ष वेधले आहे.