सेझग्रस्त शेतकऱ्यांचा ५ मार्चला निघणार धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 23:32 IST2021-02-27T23:31:55+5:302021-02-27T23:32:06+5:30
उरण, पेण, पनवेल तालुक्यातील शेतकरी येणार एकत्र

सेझग्रस्त शेतकऱ्यांचा ५ मार्चला निघणार धडक मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : महामुंबई सेझ प्रकल्प उभारण्यासाठी १५ वर्षांपूर्वी उरण, पेण, पनवेल तालुक्यातील ४५ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याच्या मागणीसाठी सेझग्रस्त शेतकऱ्यांचा ५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरच धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
एसईझेड कंपनीने सन २००५ मध्ये उरण, पेण, पनवेल तालुक्यातील ४५ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी मिळकती शासनामार्फत संपादित केल्या आहेत; परंतु त्या संपादन करण्यात आलेल्या १० हजार हेक्टर जमिनीवर १५ वर्षांनंतरही महामुंबई प्रकल्प उभारू शकले नाहीत. महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्र रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल आणि उरण या तीन तालुक्यातील ४५ गावांतील संपादनाखाली जमिनींचा एक जमीन घोटाळा आहे. बेकायदेशीर संमती निवाडे घोषित करून जमिनीच्या सातबाराच्या उताऱ्यावर मे. मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र लि. यांच्या नावाची कब्जेदार सदरी नोंद करण्यात आली आहे. या बेकायदेशीररीत्या केलेल्या नोंदी रद्द करून मूळ शेतकऱ्यांच्या नावे नोंदी पूर्ववत न झाल्याने व त्या जमीन मिळकती परत मागण्याकरिता ५ मार्च रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना १६ फेब्रुवारी २०२१ रोजी निवेदन दिले असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.
४५ गावे एकत्र
या मोर्चाच्या तयारीसाठी पेण तालुक्यातील शिर्की येथे नुकतीच बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर उरण तालुक्यातील चिरनेर व तालुक्यातील ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत. या मोर्चाला डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे. या मोर्चात पेण, पनवेल आणि उरण या तीन तालुक्यातील ४५ गावांतील सेझग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती ॲड. दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.