जेएनपीटीतील व्यापारात घट
By Admin | Updated: August 4, 2015 03:13 IST2015-08-04T03:13:20+5:302015-08-04T03:13:20+5:30
जीटीआय बंदराविरोधात कामगारांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे जेएनपीटी आणि डीपी वर्ल्ड या दोन्ही बंदरांवरच्या व्यापारावर विपरीत परिणाम

जेएनपीटीतील व्यापारात घट
उरण : जीटीआय बंदराविरोधात कामगारांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे जेएनपीटी आणि डीपी वर्ल्ड या दोन्ही बंदरांवरच्या व्यापारावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. बंदरातून कंटेनर आयात - निर्यातीची क्षमता घटल्याने कामगार आणि जीटीआय व्यवस्थापन या दोघांनी चर्चा करून सर्वसंमतीने सर्वमान्य तोडगा काढावा, अशी सूचना जेएनपीटी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी केली आहे.
जेएनपीटीच्या माध्यमातून सोमवारी सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि जीटीआय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविली होती. तिन्ही बंदरांवर होणाऱ्या आर्थिक नुकसानाची दखल घेऊन या दोघांनीही शुक्रवारपर्यंत बैठक घेऊन सामोपचाराने प्रश्न सोडविण्याचे आवाहनही बन्सल यांनी बैठकीतून केले आहे.
जीटीआय व्यवस्थापनाने नऊ वर्षांपासून काम करणाऱ्या १९४ कामगारांना कंपनीच्या पे रोलवर कायमस्वरूपी कामावर घेण्याचा आणि महेश इंटरप्रायझेस कंपनीचा कामाचा ठेका रद्द करण्याचा निर्णय सात दिवसांत घेतला नाही तर बंदराचे कामकाज बंद पाडण्याचा निर्वाणीचा इशारा सर्वपक्षीय संघर्ष समितीने शनिवारी दिला.
आंदोलनाचा जीटीआय बंदराबरोबरच येथील जेएनपीटी आणि डीपी वर्ल्ड या दोन्ही बंदरांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे जेएनपीटी अध्यक्ष नीरज बन्सल यांनी मध्यस्थीतून सर्वपक्षीय सिडको - जेएनपीटी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती जीटीआय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली होती.
जेएनपीटीच्या प्रशासन भवनात आयोजित बैठकीस माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. मनोहर भोईर, माजी आ. विवेक पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, जे. एम. म्हात्रे, संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, उरण संघर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, भूषण पाटील,आदी अधिकारी उपस्थित होते.