A decision on the jetty will be made on Thursday; Special meeting in the hall of the development minister | जेट्टीबाबतचा निर्णय गुरुवारी होणार; विकासमंत्र्यांच्या दालनात विशेषसभा

जेट्टीबाबतचा निर्णय गुरुवारी होणार; विकासमंत्र्यांच्या दालनात विशेषसभा

आगरदांडा : मासळीची विक्री करण्यासाठी जेट्टी आपणास उपलब्ध होण्यासाठी गुरुवार, १३ आॅगस्ट रोजी मत्स्य विकासमंत्री यांच्या दालनात विशेष सभा आयोजित केली आहे. नाखवा संघाच्या तीन प्रतिनिधींनी तिथे यावे व त्या ठिकाणीच आपल्या जेट्टीबाबतचा निर्णय होईल. मच्छीमारांना आवश्यक असलेली तातडीने तात्पुरत्या स्वरूपाच्या जेट्टीबाबतचा निर्णय मत्स्य विकास राज्यमंत्री यांच्या समक्ष घेण्यात येईल, असे अभिवाचन खासदार तटकरे यांनी मुरुड तालुका नाखवा संघाला दिले.

अगरदांडा बंदरात मच्छीमारांना मासळी विकण्यासाठी जेट्टी मिळावी, या आपल्या प्रमुख मागणीसाठी राजपुरी दिघी, एकदरा व मुरुड परिसरातील सर्व नाखवा मंडळी एकत्र येत, मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समन्वयक प्रकाश सरपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे सागरी आंदोलन करून शासनाचे लक्ष्य वेधले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील मासळीची मोठे मार्केट बंद असल्याने मच्छीमारांना आपली मासळी विकता येत नव्हती, त्यामुळे आम्हाला आगारदांडा बंदरात तातडीने तात्पुरत्या स्वरूपात नवीन जेट्टी बांधून मिळावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. त्या अनुषंगाने मोठे सागरी आंदोलन झाले होते. या आंदोलनाची दखल रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली असून, मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सोमवारी आगरदांडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन जेट्टीची पाहणी केली.

यावेळी मच्छीमारांनी आपली समस्या मांडताना मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी आगरदांडा जेट्टी ही मच्छीमारांसाठी योग्य व सुरक्षित असून, आम्हाला येथे मासळी व्यवसायाकरिता पुढील मोठ्या मच्छीमार बंदराची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सुविधा तयार करून मिळावी. कारण समुद्रातून पकडलेली मासळी विकण्यासाठी व्यवस्था नसल्याने, पकडलेली मासळी वाया जात असल्याचे खासदार तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समनव्यक प्रकाश सरपाटील चेअरमन महेंद्र गार्डी, जनार्दन गोवारी, लक्ष्मण मेनदाडकर, जगन्नाथ वाघरे, नारायण गोलान, धुरवा लोदी, चेअरमन पांडुरंग आगरकर, बबन शेखजी, तहसीलदार गमन गावित, तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, अतिक खतीब, सहायक पोलीस निरीक्षक रंगराव पवार, माजी शहर अध्यक्ष हसमुख जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोळी समाजाने फेडरेशन तयार करावे
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, तातडीने जेट्टी जरी मंजूर केली, तरी याला दीड वर्ष तरी उभारणीसाठी लागणार आहे. मच्छीमारांना कायमस्वरूपी जेट्टी मिळाली पाहिजे, मासळीला वाढती मागणी असून, शीतगृहसुद्धा विकसित करता आले पाहिजे,

कोळी समाजाने फेडरेशन तयार करून आपला विकास साधला पाहिजे, मासेमारीबरोबरच विविध प्रक्रिया करणारी साधनेसुद्धा निर्माण केल्यास लोकांना सुविधा व पैसेसुद्धा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे खा.सुनील तटकरे म्हणाले.

Web Title: A decision on the jetty will be made on Thursday; Special meeting in the hall of the development minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.