Dasgaon villagers to MP for alternative road; Mahad, Poladpur tour | पर्यायी रस्त्यासाठी खासदारांना दासगाव ग्रामस्थांचे साकडे; महाड, पोलादपूर दौरा

पर्यायी रस्त्यासाठी खासदारांना दासगाव ग्रामस्थांचे साकडे; महाड, पोलादपूर दौरा

दासगाव :   मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तेजीत सुरू आहे. दासगाव विभागातील जवळपास ७ वाड्यांतील आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना धोका पत्करून राष्ट्रीय महामार्गावरून ये - जा करावी लागणार आहे. या वाड्यातील नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे महामार्गालगत पर्यायी रस्ता मिळण्यासाठी एक निवेदन दिले. महाड, पोलादपूर दौऱ्यामध्ये यासंदर्भात खासदार तटकरे यांनी दासगावमध्ये थांबून येथील नागरिकांच्या या समस्येबाबत चर्चा करत पर्यायी रस्त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. चौपदरीकरणाचा आडाखडा तयार करून महामार्गासाठी जमिनी भूसंपदीत करण्यात आल्या. कामही सुरू झाले. मात्र, अनेक ठिकाणी नवीन आणि जुन्या वसाहतींसाठी अंतर्गत मार्गाचे नियोजन करण्यात आलेले दिसून येत नाही. अशाच प्रकारे दासगाव गावहद्दीत गणेशनगर, जाधववाडी, चर्मकारवाडी, न्हावी कोंड, बामणे कोंड, आदिवासी वाडी, वांद्रे कोंड आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग दिसून येत नव्हता. या वाड्यातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरूनच धोका पत्करून ये- जा करावी लागणार आहे. त्यामुळे रिहान फैरोज खान देशमुख (प्रदेश युवा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस) आणि विनय जयंता पुरारकर (दासगाव खादीपट्टा विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी या ठिकाणच्या नागरिकांशी पुढे होणाऱ्या गैरसोयीबद्दल चर्चा केली आणि पर्यायी रस्त्यासाठी येथील ग्रामस्थांचे निवेदन खासदार सुनील तटकरे यांच्याकडे पोच केले. महाड- पोलादपूर दौऱ्यामध्ये खासदारांनी दासगाव या ठिकाणी थांबून या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी ग्रामस्थ नथुराम निबरे, पांडुरंग निवाते आणि किशोर जाधव यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणच्या अडचणींसंदर्भात खासदार तटकरे यांच्याकडे चर्चा केली. मागणी रास्त असल्याने आपण यामध्ये जातीने लक्ष घालू, असे सांगत खासदारांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांना या ठिकाणचे निरीक्षण करण्यास सांगत हा विषय मार्गी लावण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले.

सोमवारी महामार्ग विभागाचे अधिकारी श्रीकांत बांगर आणि अमोल माडकर यांनी या ठिकाणची पाहणी करून पर्यायी मार्ग संदर्भात आडाखडा तयार करून वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे अश्वासन दिले.मात्र हा पर्यायी मार्ग झाला तर या वाड्यांतील नागरिकांची पर्यायी रस्त्याची समासाय दूर होणार आहे.

Web Title: Dasgaon villagers to MP for alternative road; Mahad, Poladpur tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.