CoronaVirus Lockdown News: अंशत: लाॅकडाऊनसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:26 AM2021-04-06T00:26:40+5:302021-04-06T00:26:55+5:30

राज्यात निर्बंध लावताना राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून, लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे.

CoronaVirus Lockdown News: Administration ready for partial lockdown | CoronaVirus Lockdown News: अंशत: लाॅकडाऊनसाठी प्रशासन सज्ज

CoronaVirus Lockdown News: अंशत: लाॅकडाऊनसाठी प्रशासन सज्ज

Next

- निखिल म्हात्रे

अलिबाग : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यात सर्वत्र सोमवारपासून अंशत: लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. सोमवार, ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल, असे रविवारी जाहीर करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतु निर्बंध सोमवारी रात्रीपासून लागू हाेणार की फक्त शनिवारी, रविवारी असणार याविषयी व्यवसायीक व नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

राज्यात निर्बंध लावताना राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून, लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे.

राज्यात १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.   अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे लागणार आहे.

हाॅटेल व्यावसायिकांचे अवसान गेले
लाॅकडाऊननंतर साधारण नऊ महिन्यानंतर हाॅटेल व्यवसाय सुरु झाले होते. हाॅटेल व्यावसायिकांची घडी रुळावर येणार तेवढ्यात पुन्हा एकदा मिनी डाॅकडाऊनची हाक दिल्यावर हाॅटेल व्यावसायिकांचे अवसान गेले आहे. साधारण सायंकाळी आठ वाजल्यानंतर हाॅटेल व्यवसायाला खरी सुरुवात होते. मात्र, पार्सल सेवा सुरु असल्याने आता ताकाची तहान दुधावर भागवावी लागणार आहे.

रिक्षा व मिनीडोअर चालकांची चिंता वाढली
गेल्या काही दिवसांपासून रिक्षा व मिनीडोअर सेवा पूर्व पदावर आली होती. त्यामुळे या चालकांचा संसाराचा गाडा पूर्वपदावर येत होता. मात्र, राज्यात अचानक मिनी लाॅकडाऊन करण्यात आल्याने पुन्हा डोक्यावर ताण वाढला आहे.

पोलीस यंत्रणा सज्ज
पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणच्या नाक्यांवर चेकपोस्ट सुरु केले आहेत. तसेच नागरिकांना समज देऊन प्रवाशांनी मास्क घातलेला हवा, असे समाज प्रबोधन करून नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन करीत आहेत, तर दुसरीकडे अनावश्यक फेऱ्या मारणाऱ्यांवर कारवाई करून समज देत आहेत.

प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क यासह आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. गर्दीत जाणे टाळावे, गर्दी होईल अशा कार्यक्रम, समारंभांचे आयोजन करु नये आणि अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. कोणाला काही लक्षणे जाणवत असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे.

भाजीपाला विक्रेत्यांचे वेळापत्रक
जिल्ह्यात दिवसा संचार बंदी असल्याने एकत्र येण्यास मनाई आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला विक्रेत्यांना याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आली नसल्याने सोमवारी सकाळी भाजीपाला विक्री करण्यासाठी अलिबाग बाजारपेठेत आले होते. मात्र, त्यावेळी सरकारचे कोरोनाबाबतचे आदेश कळताच या विक्रेत्यांनी एक वेळ निश्चित करून आपले वेळापत्रक तयार केले आहे.

औषध विक्रेत्यांनी घातले बंधन
सोमवारपासून संचारबंदी सुरु करण्यात आली असल्याने जिल्हाभरातील औषध विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोर मास्क बंधनकारक व सोशल डिस्टन्सचे स्टीकर लावून गर्दी कमी करण्याची युक्ती केली आहे. पाच जणांना दुकानासमोर उभे राहण्यास दुकानचालकांनी परवानगी दिली आहे.

छोट्या व्यावसायिकांना फटका
किनार पट्ट्या व धार्मिक स्थळांवर पर्यटकांची रेलचेल असल्याने तेथील स्थानिकांना रोजगार मिळत होता. मात्र, आता पुन्हा सरकारने दिवसा जमावबंदी व रात्री लाॅकडाऊन केल्याने या छोट्या व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Web Title: CoronaVirus Lockdown News: Administration ready for partial lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.