Coronavirus: All markets in Raigad district closed, rush to buy essential goods | Coronavirus : रायगड जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी

Coronavirus : रायगड जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी

अलिबाग : कोरोना विषाणू रोखण्यासाठी शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सोनार, कापड विक्रेते, भांडी
दुकान मालकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला असून शासनाचा आदेश येईपर्यंत ही दुकाने बंद राहणार आहेत. बाजारपेठ बंद होत असल्याचे वृत्त नागरिकांमध्ये वाऱ्यासारखे पसरताच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. गर्दीच्या ठिकाणी याच कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असतो. त्यामुळे सध्या बाजारपेठेत होणारी गर्दी रोखण्यासाठी जिल्हा प्रशानाच्या वतीने शुक्रवारी अलिबागेत व्यापारीवर्ग व हॉटेल मालकांची बैठक घेण्यात आली होती. गर्दी टाळण्यासाठी व्यापारी पुढे आला आहे. ३१ मार्चपर्यंत ही दुकाने बंद राहणार आहेत. बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद राहतील. केवळ औषधी दुकाने याला अपवाद राहणार आहेत.

व्यापारी वर्गाने स्वत:हून या मोहिमेत पुढाकार घेतला असून गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना केली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता उपाययोजना आणि जनजागृतीमुळे जिल्हा सुरक्षित असला तरी बाजारात होणाºया गर्दीने मात्र कोरोनाचा धोका संभवू शकतो. कोरोना विषाणू समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ काही ठिकाणी पोलिसांनी आवाहन करीत तर काही ठिकाणी स्वत:हून बंद केली होती.

शुक्रवारी बाजारपेठ बंद होत असल्याचे वृत्त नागरिकांमध्ये वाºयासारखे पसरताच लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. रोजच्या वापरासाठी अवश्यक असलेला किराणा, कांदे-बटाटे, भाजीपाला पुरेल इतका साठा करून ठेवला आहे. तसेच कापूर, साथरोगावर नियंत्रण करणाºया वस्तूही नागरिकांनी खरेदी केल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक व्यावसायिकाने आज कोरोना जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एक चांगला संदेश जात आहे. कोरोना रोखण्यासाठी आम्ही दुकाने बंद ठेवली आहेत. यामध्ये आम्हा दुकानदारांना तोटा सहन करावा लागला असला तरी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
- राकेश जैन,
ज्वेलर्स मालक

श्रीवर्धनमधील पर्यटनस्थळे बंद
श्रीवर्धन - रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या श्रीवर्धन शहरातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. श्रीवर्धन शहराच्या हद्दीतील समुद्रकिनारा, जीवनेश्वर कुंड व भुवनाळे तलाव बंद करण्यात आलेले आहेत. शुक्रवारी दिवसभर नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाºयाने श्रीवर्धन शहरातील एटीएम, पोस्ट कार्यालय परिसर, श्रीवर्धन पोलीस ठाणे व इतर सर्व सरकारी कार्यालयांच्या परिसराची फवारणी करण्यात आली. तसेच नगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व जनतेत कोरोना व्हायरसविषयी जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी भित्तीपत्रके चिकटवली असल्याचे निदर्शनास येते.

नगरपालिकेच्या घंटागाडीवरून नागरिकांना कोरोना विषाणू संसर्गाविषयी माहिती देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ मानले जाते. हरिहरेश्वर , दिवेआगर, दिघी व श्रीवर्धन शहर या सर्वांचा पर्यटनस्थळात समावेश केला जातो. श्रीवर्धन शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे.
शहरातील सोमजाई मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, जीवनेश्वर मंदिर व पेशवे मंदिर बघण्यासाठी वर्षभर पर्यटकांची रीघ लागलेली असते. श्रीवर्धनचा समुद्रकिनारा सदैव पर्यटकांना आकर्षित करतो. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व त्यास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, नगरपालिका मुख्याधिकारी किरण कुमार मोरे व नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी हॉटेल व्यावसायिकांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
त्यानुसार श्रीवर्धन शहरातील पर्यटन संस्थेच्या ४५ व्यावसायिकांनी ३१ मार्चपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे लेखी आश्वासन दिल्याचे
संस्थेचे उपाध्यक्ष गणेश पोलेकर यांनी सांगितले. राज्य सरकारने सर्व शाळा, कॉलेजला जाहीर केलेल्या सुट्टीच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने सर्व खासगी क्लासेस बंद केले आहेत.

नगरपालिकेच्या हद्दीत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व सरकारी कार्यालयांत फवारणी केली असून जनतेत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. जनता व प्रशासन मिळून यशस्वीपणे कोरोनाचा सामना करू.
- किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपालिका

तळगड किल्ला, कुडा लेणी पर्यटकांसाठी बंद
तळा : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे आदींवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील तळगड किल्ला व कुडा लेणीवर पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार असून पर्यटकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
किल्ले, लेणी या ठिकाणी पर्यटक येत असल्याने गर्दी होऊन आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून किल्ले, लेणी परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली असल्याचे जंजिरा उपमंडळचे संवर्धन साहाय्यक बी. व्ही. येळीकर यांनी सांगितले.

खोपोलीकरांनी ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद द्यावा
खोपोली : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबतचे आवाहन जनतेला केले आहे. त्याला खोपोलीतील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा तसेच या कालावधीमध्ये कचरा उचलण्यासाठी येणारी घंटागाडीही बंद ठेवण्यात येणार असून, शहराच्या काही भागांमध्ये सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेमध्ये सार्वजनिक व ग्रुप नळ कनेक्शन आहेत तेथे पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी शनिवार २१ मार्च रोजी पुरेसा पाणीसाठा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शेटे, नगराध्यक्षा सुमन औसरमल व उपनगराध्यक्षा विनिता कांबळे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
खोपोली शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रभागांमध्ये साथरोग प्रतिबंधक औषध फवारणी, पावडर फवारणी, धूर फवारणी सुरू करण्यात आलेली असून नागरिकांमध्ये कोरोनाविषयक जनजागृती होण्याकरिता पॅम्पलेट वाटप, बॅनर प्रसिद्धी, रिक्षाद्वारे दवंडी या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. खोपोली शहरातील होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील बाजारपेठ ही दूध व भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, औषधालय वगळून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील विविध मॉल, थिएटर, गार्डन, जिम, नाट्यगृहे, गगनगिरी आश्रम, मंगल कार्यालय ३१ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद आहेत. बस स्थानक, बस डेपो, रेल्वे स्टेशनकात स्वच्छता राखण्यास संबंधितांना नगर परिषदेमार्फत सूचना दिल्या आहेत.

कर्जत बाजारपेठ तीन दिवस बंद
कर्जत : आजचे युद्ध हे विषाणूशी आहे, कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध असून त्याचा मुकाबला एकजुटीने करण्याची गरज आहे, जनतेने गर्दी करणे बंद करावे तसेच सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी केले आहे.
आपण एकजुटीने मुकाबला केला तर हे संकट काहीही करू शकत नाही, शासन ज्या-ज्या सूचना देत आहे तेवढ्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. नगर परिषदेच्या वतीने गर्दी कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करत आहे. नगरपरिषद क्षेत्रातील सर्व व्यापारी वर्ग, हातगाडी संघटना, हॉटेल संघटना, रिक्षा संघटना यांना निवेदन देऊन आपले व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
रविवार २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु पाळा, असे आवाहन केले आहे. कर्जत व्यापारी फेडरेशनने नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार २१ व २२ मार्च रोजी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये किराणा माल, कपडा दुकान, सोने-चांदी दुकान, हार्डवेअर दुकान, कटलरी दुकान, हॉटेल व्यवसाय आदींचा समावेश आहे. मेडिकल आणि भाजीची दुकाने वगळण्यात आली आहेत.
शुक्रवारी कर्जत बाजारपेठ बंद असते, २० मार्च शुक्रवार असल्याने कर्जत शहरात शुक्रवारचा बाजार भरतो. मात्र त्याला बंदी घातल्याने २०, २१ आणि २२ मार्च रोजी असे तीन दिवस कर्जत बाजारपेठ बंद राहणार आहे. २० मार्च रोजी दुपारी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आणि नगरसेविका स्वामिनी मांजरे, विशाखा जिनगरे, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे यांनी रस्त्यावर बसलेल्या छोट्या छोट्या व्यावसायिकांना पत्रक वाटून बंदमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन केले.

Web Title: Coronavirus: All markets in Raigad district closed, rush to buy essential goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.