Coronavirus: अलिबागला प्रयोगशाळा मंजूर करा; पालकमंत्री आदिती तटकरेंचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 00:37 IST2020-07-01T00:37:37+5:302020-07-01T00:37:53+5:30
रायगड जिल्ह्यात दिवसाला किमान १०० हून अधिक रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

Coronavirus: अलिबागला प्रयोगशाळा मंजूर करा; पालकमंत्री आदिती तटकरेंचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन
रायगड : रायगड जिल्ह्यातील नागरिकांची वेळेत आरोग्य तपासणी होऊन जिल्ह्यातील सर्व स्वॅब टेस्टिंग रिपोर्ट जिल्हास्तरावरच वेळेत मिळणे गरजेचे आहे. यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू तपासणी यंत्रणा आणि प्रयोगशाळा मंजूर करावी, अशी मागणी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी टोपे यांना दिले.
रायगड जिल्ह्यात दिवसाला किमान १०० हून अधिक रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची स्वॅब टेस्ट घेतल्यानंतर मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येते. त्यामध्ये बराच कालावधी जातो. वेळ वाचण्यासाठी आणि तातडीने रिपोर्ट प्राप्त होण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू तपासणी यंत्रणा आणि प्रयोगशाळा मंजूर करावी, अशी मागणी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
‘मुंबईतील ताण कमी होईल’
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. १५ तालुक्यांतून घेण्यात आलेले स्वॅब हे जिल्हा स्तरावरच तपासण्यात आल्यास सर्वांच्याच सोयीचे होणार आहे, तसेच मुंबईतील प्रयोगशाळेवरील ताण कमी होणार असल्याने जिल्ह्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, रायगडकरांसाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात करोना विषाणू तपासणी यंत्रणा उभी केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे लवकर तपासणी अहवाल प्राप्त होऊन उपचार लवकर करता येणार आहेत, परंतु राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोणता निर्णय घेतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.