प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रांनाच नोकरीत सामावून घेण्याची कॉंग्रेसची जेएनपीएकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 14:09 IST2023-06-09T14:09:32+5:302023-06-09T14:09:43+5:30
काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद घरत यांनी गुरुवारी जेएनपीए प्रशासनाच्या नवनियुक्त सेक्रेटरी व वरिष्ठ प्रबंधक मनिषा जाधव यांची भेट घेतली.

प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रांनाच नोकरीत सामावून घेण्याची कॉंग्रेसची जेएनपीएकडे मागणी
मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीए अंतर्गत असलेल्या विविध बंदरे आणि सीएफएसमध्ये स्थानिक भुमीपुत्रांनाच प्राधान्य देण्याची मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी जेएनपीए प्रशासनाच्या नवनियुक्त सेक्रेटरी व वरिष्ठ प्रबंधक मनिषा जाधव यांची भेट घेऊन केली आहे.
उरण परिसरात अनेक राष्ट्रीय प्रकल्प, कंपन्या गोडावून आहेत.मात्र तेथे प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत न घेता स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य न देता परप्रांतीयांची भरती केली जाते. त्यामुळे उरणमधील हजारो स्थानिक भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त बेरोजगार होत चालले आहेत. बेरोजगारीमुळे कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.विविध संकटाना, समस्यांना त्या कुटुंबाला सामोरे जावे लागते.त्यामुळे नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन स्थानीक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याच्या उद्देशाने व स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद घरत यांनी गुरुवारी (८) जेएनपीए प्रशासनाच्या नवनियुक्त सेक्रेटरी व वरिष्ठ प्रबंधक मनिषा जाधव यांची भेट घेतली.
कार्यालयात झालेल्या भेटीत विविध समस्या व नोकऱ्या संदर्भात महेंद्र घरत यांनी चर्चा करून स्थानीक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी केली. या वेळी मनिषा जाधव यांनी महेंद्र घरत व त्यांच्या शिष्ट मंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांनाच नोकरीत प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,जेएनपीएचे विश्वस्त रविंद्र पाटील,मार्तंड नाखवा, किरिट पाटील, कमलाकर घरत, रेखाताई घरत, निर्मला पाटील, एकनाथ घरत,जयवंत पाटील,संजय ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, भालचंद्र घरत, रोहित घरत, लंकेश ठाकूर,हितेन घरत, अब्दुल शिलोत्री,विनोद पाटील,आदित्य घरत आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.