लोकमत न्युज नेटवर्कवैभव गायकर, पनवेल:पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खड्डे येथील रहिवाशांची डोकेदुखी ठरत असल्याने मनसेने पालिका प्रशासनाविरोधात दि.10 रोजी अनोखे आंदोलन छेडत नागरिकांना पनवेल महानगरपालिका क्षेत्रात खड्ड्यांची सफर घडवली.
याकरिता एका खास बसचे देखील आयोजन करण्यात आले होते.या सफरी दरम्यान खुद्द यमाचे वेषभूषा धारण केलेला प्रतीकात्मक यम देखील या आंदोलनात सहभागी झाला होता.हि सफर पनवेल महानगरपालिका मुख्यालयातून सुरु झाली ती पनवेल शहर,नवीन पनवेल ,खांदा कॉलनी ,कामोठे आणि कळंबोली दरम्यान घडवण्यात आली.रस्त्याच्या कामात प्रचंड अनियमितता झाली असून हा भ्रष्ठाचार आहे.रस्त्याचा दर्जा योग्य नसल्याने नागरिकांना पावसात खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे.विशेष म्हणजे एकविसाव्या शतकातील शहरांमध्ये आजही यादवकालीन आणि मुघलकालात शोभणारे खड्डे नागरिकांना पहावयास मिळतात.
पालिकेने लवकरात लवकर खड्डे बुजवून नागरिकांचा प्रवास सुखकर न केल्यास पुढील वेळेस महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्यांची सफर घडविण्यात येईल असा ईशारा पनवेल महानगर पालिका क्षेत्राचे मनसेचे अध्यक्ष योगेश चिले यांनी दिला आहे.आम्ही वारंवार पालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाणार नाही.आमचे हे आंदोलनच पालिका अधिकाऱ्यांसाठी निवेदन असल्याचे चिले पुढे म्हणाले.