‘सीईटीपी’ आयएमएस मानांकन

By Admin | Updated: February 20, 2016 02:06 IST2016-02-20T02:06:02+5:302016-02-20T02:06:02+5:30

महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामाजिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला गुणवत्ता, पर्यावरण व सुरक्षा नियोजन

'CETP' IMS rating | ‘सीईटीपी’ आयएमएस मानांकन

‘सीईटीपी’ आयएमएस मानांकन

महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामाजिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला गुणवत्ता, पर्यावरण व सुरक्षा नियोजन प्रणालीसाठी आयएमएस आंतरराष्ट्रीय मानांकन जाहीर झाल्याची माहिती एमएमए सीईटीपीचे अध्यक्ष एस. बी. पठारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळवणारा भारतातील दुसरा तर महाराष्ट्रातील पहिला सामाजिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ठरल्याचा दावा पठारे यांनी यावेळी केला.
गुजरात राज्यातील वटवा येथील ग्रीन एन्व्हॉरमेंट या सामाजिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला यापूर्वी हे मानांकन प्रमाणपत्र मिळाले होते, अशी माहितीही पठारे यांनी दिली. छत्तीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये ९० टक्के रसायनिक कारखाने असून सुमारे दीडशे लहान मोठे कारखाने सध्या सुरु आहेत. रासायनिक कारखान्यामुळे या परिसरात प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. औद्योगिकीकरणामुळे या तालुक्याची प्रगती होत असतानाच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणावर मात करण्यासाठी २००३ मध्ये उत्पादक संघटनेने सामाजिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची सहकारी संस्था (एमएमए सीईटीपी) स्थापन केली. मात्र त्याची प्रत्यक्ष प्रक्रिया २००५ मध्ये कार्यान्वित झाली. गेल्या ११ वर्षाच्या कार्यकाळात सीईटीपीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. प्रत्येक कारखान्यात दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प असले तरी ते पूर्ण क्षमतेने चालवले जात नव्हते. त्यामुळे सीईटीपीत येणाऱ्या दूषित पाण्याचा सीओडी प्रमाणाबाहेर जास्त होता. त्यामुळे कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कटेकोरपणे चालण्यासाठी सीईटीपीतर्फे मार्गदर्शन केले गेले. मात्र असे असतानाही काही कारखाने जाणीवपूर्वक गैरमार्गाने प्रमाणाबाहेर सीओडीचे प्रदूषित पाणी सीईटीपीत सोडत असल्याने सीईटीपीचा परफॉर्मन्स खराब होत असे. आॅक्टोबर २०१४ मध्ये प्रदूषणावर शंभर टक्के मात करण्यासाठी व प्रदूषण मंडळाचे मानांकन राखण्यासाठी प्रत्येक कारखान्यात ईटीपीचे स्टेजवाईज सॅम्प्लिंग घेण्याचा कठोर निर्णय सीईटीपीने घेतला.
गेल्या वर्षभरापासून उचललेल्या कठोर पावलांमुळे प्रदूषण मंडळाच्या मानांकनानुसार रिझल्ट येवू लागले. जून १५ पासून प्रत्येक ३० मिनिटाला आॅनलाइन मॉनिटरिंग मशिनच्या सहाय्याने रिडिंग रेकॉर्डिंग हटवून ते थेट प्रदूषण मंडळाच्या मुंबई व केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या दिल्ली कार्यालयातही प्रदर्शित होवू लागले. अशा प्रकारची अद्ययावत यंत्रणा बसवणारा महाराष्ट्रातील महाडचा पहिला सीईटीपी प्रकल्प ठरला अशी माहिती पठारे यांनी यावेळी दिली.

Web Title: 'CETP' IMS rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.