पाणलोटला भ्रष्टाचाराचे गालबोट
By Admin | Updated: August 29, 2015 22:18 IST2015-08-29T22:18:36+5:302015-08-29T22:18:36+5:30
तालुक्यातील खर्डी गावातील पाणलोट समितीवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच आता तालुक्यातील अप्पर तुडील या गावातील पाणलोट समितीवर भ्र्रष्टाचाराचे आरोप

पाणलोटला भ्रष्टाचाराचे गालबोट
दासगाव : तालुक्यातील खर्डी गावातील पाणलोट समितीवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच आता तालुक्यातील अप्पर तुडील या गावातील पाणलोट समितीवर भ्र्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम केले गेले, परदेशी वास्तव्यास असलेल्या आणि मयत व्यक्तींच्या नावे असलेल्या शेतजमिनीत काम करणे, ग्रामपंचायतीचा ट्रक्टर काम करताना का वापरला नाही अशा अनेक मुद्यांवरून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. शनिवारी झालेल्या ग्रामसभेत या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्याचा ठराव सर्वांनुमते संमत करण्यात आला.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असे बिरूद एकात्मिक पाणलोटचे आहे पण आता ‘पाणी अडवा, पैसे जिरवा’ असे उपरोधात्मक बोलले जात आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये पाणलोट भ्रष्टाचार गतवर्षी उघड झाला आहे. महाड तालुक्यातील खर्डी गावातील पाणलोट भ्रष्टाचाराबाबत फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आमसभेमध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या सत्काराचे वेळी नागरीक गोंधळ घालतात. पाणलोटचा सर्वच कारभार भ्रष्ट असल्याबाबत सर्वच ठिकाणी चर्चा सुरू असल्याचे वातावरण सद्या महाड तालुक्यात आहे. कागदोपत्री अगदी काटेकोरपणा बाळगला गेला असला तरी आता पाणलोट समित्यांच्या कारभाराबाबत चौकशीचा फेरा वाढू लागला आहे.
पाणलोटच्या माध्यमांतून झालेल्या खर्चाबाबत अनेक माहिती अधिकार पत्र दाखल झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यापेक्षा अधिक निधी पाणलोट मार्फत खर्ची पडत आहे. कृषी विभागामार्फत होणारा हा खर्च सर्वस्वी पाणलोट समित्यांच्या मार्फत होत असून खर्चाचे मापदंड सर्वसामान्य नागरिकांसाठी फार कठिण झाले आहे.
अप्पर तुडील गावात पाणलोट समितीच्या मार्फत पाण्याची टाकी, सलग समतल चर , जुनी भातशेती दुरुस्ती, अनघड दगडी बांध आदी काम केली गेली आहेत. गावात झालेल्या जुनी भातशेती दुरुस्तीवर ग्रामस्थांचा आक्षेप आहे. जुनी भातशेती दुरुस्ती म्हणजे शेतातील माती ओढून बांध बंदिस्ती करण्याचे काम ट्रॅक्टरच्या सहाय्याने काम केले गेले. हे काम करताना ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर आहे, तो भाड्याने देण्याबाबत ठराव झालेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर वापरावा अशी मागणी होती. मात्र ठेकेदारामार्फत काम केल्याने ग्रामपंचायतीचे मोठे उत्पन्न बुडाले आहे, असा आक्षेप ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला आहे.
निधी खर्चात तफावत
बांध बंदिस्तीचे हे काम अनिल परशुराम बेल, विजय गोविंद-दिवेकर, हेमराज सुखराम सुर्वे, पूर्वा हेमराज सुर्वे आणि विवेक विजय पालांडे या ठेकेदारांनी केले आहे. अप्पर तुडील गावातील ४९.७१ हेक्टर शेत जमीन दुरुस्त केली. याच्या बदल्यात या पाच ठेकेदारांना १४ लाख ७८ हजार ९७४ रुपये देण्यात आले.
मुळात एका टॅ्रक्टरची किंमत ही सुमारे ६ लाख आहे. नवीन टॅ्रक्टरच्या किंमतीच्या दुप्पट काम करण्यात आले. ग्राम पंचायतीकडे स्वत:चा कर्जाने घेतलेला ट्रॅक्टर आहे. ते कर्ज अजूनही फेडले गेलेले नाही. अशा परिस्थितीत ट्रॅक्टरला कामाची गरज होती. पण गावातील हे काम केले जात असताना स्वत: ग्रामपंचायतीला डावलण्यात आले. असा आरोपही केला जात आहे.
गेली अनेक दिवस या विषयावर गावात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. ग्रामस्थांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतल्याने प्रथम गावात झालेल्या पाणलोट समितीच्या कामाबाबत माहिती अधिकारात अर्ज टाकून माहिती प्राप्त करण्यात आली. त्या माहितीच्या आधारे या कामांची चौकशी झाली पाहिजे असा सूर निर्माण झाला आहे.
एकात्मिक पाणलोट कार्यक्रमाअंतर्गत शेतीची बांधबंदिस्ती वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी डोंगरातील चर, ओढे, नाल्यांवरील बांधारे अशी विविध शेती संबंधीची काम केली जातात. या व्यतिरिक्त कामांना प्रोत्साहन मिळण्यासाठी गावच्या विकासासाठी विविध निधीही दिला जातो. या निधीचा विनियोग करण्यासाठी स्वतंत्र नियमावली ही आहे. आता गावातील बचत गटांसाठी वेगळा निधीही आला आहे. यामुळे सर्वात जास्त निधी हा कृषी विभागाकडे खेळत आहे.
शनिवारी अप्पर तुडील ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. यावेळी पाणलोट समितीच्या भ्रष्टाचाराचा विषय आला. विद्यमान सरपंच तथा पाणलोट समितीच्या सद्याच्या अध्यक्षा सुनंदा शांताराम निर्मल आणि रिहान फैरोजखान देशमुख यांनी या पाणलोटचा भ्रष्टाचार विषयावर चर्चा घडवून आणली. या चर्चेनंतर सदर प्रकरणी चौकशी व्हावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
- परमेश्वर तिडके, ग्रामसेवक, अप्पर तुडील ग्रामपंचायत.
अप्पर तुडील पाणलोट समितीच्या कामकाजाबाबत कार्यालयाकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. शेतीची बांधबंदिस्ती पाणलोट मार्फत केली जाते. यावेळी ७/१२ वरील मयत शेतकऱ्यांच्या परवानगी प्रश्न निर्माण होत नाही. होणारे काम हे समितीमार्फत केले जाते आणि त्याचे पैसे देखील समिती धनादेशाद्वारे आदा केले जाते. कृषी विभाग समितीला मार्गदर्शनांचे काम करते.’
- पी.बी. नवले, तालुका कृषी अधिकारी.