विहित वेळेत कालवे खोदले नाहीत
By Admin | Updated: May 10, 2017 00:17 IST2017-05-10T00:17:04+5:302017-05-10T00:17:04+5:30
मुरुड तालुक्यातील आंबोली धरण बांधून पाच ते सहा वर्षे पूर्ण झाली असतील, परंतु कालव्याचे पाणी शेतीला विहित वेळेत

विहित वेळेत कालवे खोदले नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यातील आंबोली धरण बांधून पाच ते सहा वर्षे पूर्ण झाली असतील, परंतु कालव्याचे पाणी शेतीला विहित वेळेत न सोडल्याने असंख्य कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून याला संबंधित शासन जबाबदार असल्याचा निर्वाळा अलिबाग-मुरूडचे आमदार पंडित पाटील यांनी दिला आहे. यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठवू असा इशारा दिला आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी करून सुद्धा ही मागणी दुर्लक्षित झाली आणि मे महिन्यात शेतीला पाणी सोडले गेले नाही तर जमिनी कोरड्या पडून नापीक होण्याचा धोका यावेळी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोकणातील शेतकरी पाणी असून सुद्धा उपाशी राहिला असल्याची टीका यावेळी आमदार पाटील यांनी केली आहे. पाणीप्रश्नाबाबत ते आपली भूमिका स्प्ष्ट करताना पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी आमदार पाटील म्हणाले की,कालव्याने जर शेतीला पाणी पुरवठा झाला तर धरणातील पाणी वाहून गेल्याने पाणी जमिनीत मुरेल त्यामुळे आजूबाजूला असणारे विहिरी, तलावे व नाले यांना भरपूर प्रमाणात पाणी लागू शकते.
परंतु हेच धोरण नेमके शासनाने उलटे लागू केले आहे. जर धरणातील पाणी बंदिस्त पाइपने पुरविले तर त्याचा फायदा आजूबाजूला असणाऱ्या नद्या व तलावांना होणार नाही. मग असे बंदिस्त पाइप लाइनचे धोरण काय उपयोगाचे याचा शासनाने गंभीर विचार करावा, अन्यथा येत्या अधिवेशनात यावर आवाज उठवू असा इशारा आमदार पंडित पाटील यांनी दिला.