जेएनपीए अंतर्गत असलेल्या सेंट मेरी विद्यालयाच्या आवारात केबलला आग, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 16:14 IST2023-08-12T16:13:31+5:302023-08-12T16:14:17+5:30
जेएनपीए बंदर अंतर्गत असलेल्या कामगार वसाहतीमध्ये सेंट मेरी विद्यालय आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १० वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

जेएनपीए अंतर्गत असलेल्या सेंट मेरी विद्यालयाच्या आवारात केबलला आग, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
मधुकर ठाकूर
उरण - जेएनपीए बंदर वसाहतीमधील सेंट मेरी विद्यालयाच्या आवारात उघड्यावर असलेल्या केबलला शुक्रवारी (११) रात्रीच्या सुमारास आग लागली.अग्नीशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. मात्र सुदैवाने रात्रीच्या सुमारास आग लागल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
जेएनपीए बंदर अंतर्गत असलेल्या कामगार वसाहतीमध्ये सेंट मेरी विद्यालय आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १० वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयाच्या आवारात खड्डे खोदून केबल टाकण्याचे काम सुरू आहे.कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात उघड्यावरच असलेल्या केबलला शुक्रवारी (११) रात्री सुमारे १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीच्या भक्ष्यस्थानी ज्वालाग्राही रबरी केबल पडल्याने पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.
आगीच्या ज्वालाही उंचीवर दिसु लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग तत्काळ आटोक्यात आणली.त्यामुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला. दिवसा शाळा सुरू असताना आगीची घटना घडली असती तर अशी साधार भीती पालक वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आगीची शक्यता व्यक्त करतानाच या आगीत शाळेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती जेएनपीए कामगार ट्र्स्टी रविंद्र पाटील यांनी दिली.तर या आगीच्या घटनेची पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली. शाळेच्या आवारात आगी सारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची सेंट मेरी विद्यालयाचे व्यवस्थापन तसेच जेएनपीए बंदर प्रशासनाने दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करावी अशीही मागणी पालकांकडून केली जात आहे.