पाचाडमध्ये वणव्यामुळे हजारो झाडे भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:42 IST2018-11-26T23:42:24+5:302018-11-26T23:42:32+5:30
वनविभागाने चौकशी करण्याची मागणी

पाचाडमध्ये वणव्यामुळे हजारो झाडे भस्मसात
बिरवाडी : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावाजवळ नाचण टोककड्याच्या डोंगरावर रविवारी दुपारी वणव्याने पेट घेतला. गावातील तरु णांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वणवा विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने तो आणखी पसरला आणि डोंगरावरील हजारो झाडे भस्मसात झाली. हा वणवा पाचाडपासून बांधणीच्या माळ या गावापर्यंत पसरल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पाचाड नाक्यापासून काही अंतरावर नाचण टोक कडा डोंगर सुरू होतो. या डोंगराच्या माथ्यावर वणवा पेटत असल्याचे पाचाड गावातील तरु ण मंगेश शेडगे, शिवाजी शेडगे, सुरेश गायकवाड, नागेश हाटे, बंडू बेदुगडे, अक्षय अवघाडे आदींच्या निदर्शनाला येताच त्यांनी वणवा विझविण्यासाठी धाव घेतली. तोपर्यंत वणव्याने रौद्ररूप घेतले होते, पाचाडजवळ असलेला डोंगराचा बहुतांश परिसर वणव्याने व्यापला होता. वणवा विझविण्यासाठी त्या भागांमध्ये कोणतीही सुविधा नसल्याने संपूर्ण डोंगर आगीने व्यापलेला दिसून येत असल्याचे मंगेश शेडगे या तरु णाने सांगितले.
पाचाड परिसरामध्ये वणवे लावण्याचे प्रमाण वाढत असल्याने स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त होत आहे. पाचाडमध्ये वर्षाचे दहा महिने पाणीटंचाई असते. त्यामुळे गावाजवळ वणवे लागले तरी पाण्याने विझविता येत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. वन विभागाने पाचाड, किल्ले रायगड परिसरामध्ये हजारो झाडांची लागवड केली असून पाण्याअभावी झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत असून वन विभागाकडून वणव्यांबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तरु णांनी केली आहे.