लाचखोर अधिकारी अद्याप फरार
By Admin | Updated: August 4, 2015 03:11 IST2015-08-04T03:11:15+5:302015-08-04T03:11:15+5:30
तालुक्यातील पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करताना ठेकेदाराचे बिल अदा करताना कर्जत तालुक्याचे कृषी अधिकारी आणि तीन कृषी पर्यवेक्षक

लाचखोर अधिकारी अद्याप फरार
कर्जत : तालुक्यातील पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करताना ठेकेदाराचे बिल अदा करताना कर्जत तालुक्याचे कृषी अधिकारी आणि तीन कृषी पर्यवेक्षक यांनी ठेकेदाराकडे लाच मागितली होती. या प्रकरणी २३ जुलै रोजी दुपारी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साडेतीन लाखांची लाच घेताना तीन कृषी पर्यवेक्षक यांना रंगेहाथ पकडले. मात्र तालुका कृषी अधिकारी फरार झाला होता. त्या तीन कृषी पर्यवेक्षकांची जामिनावर सुटका झाली आहे, मात्र तालुका कृषी अधिकारी अद्याप फरार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्याचा शोध घेत आहे.
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करण्यात येत आहेत. पुणे येथून कर्जत येथे कृषी विभागात नोकरीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी पाणलोटची कामे करण्यासाठी पुणे येथील शिवा लालू पवार या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली. ठेकेदाराने कर्जत तालुक्याच्या कशेळे विभागामध्ये वर्षभरात ५० लाखांची कामे केली होती. या कामाच्या बिलाच्या संदर्भात या कार्यालयातील लोकसेवकांनी कमिशन (लाच) म्हणून त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती. यामध्ये कृषी अधिकारी सुरेश खेडकर, सहायक कृषी अधिकारी रावसाहेब आंधळे, कृषी पर्यवेक्षक संदीप जाधव, नंदकुमार पवार यांचा समावेश होता. याबाबत ठेकेदार शिवा पवार (४५, रा. पुणे) यांनी रायगड लाचलुचपत विभागाकडे धाव घेवून तक्र ार केली होती. २३ जुलै रोजी या विभागाच्या महिला पोलीस निरीक्षक इनामदार यांनी दुपारी साडेचार वाजता रायगड लाचलुचपत विभागाने कर्जत कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात धाड टाकली असता ठेकेदार शिवा लालू पवार यांच्याकडून ३ लाख ४१ हजारांची रोख रक्कम कृषी सहाय्यक रावसाहेब आंधळे, कृषी पर्यवेक्षक संदीप जाधव,नंदकुमार पवार हे स्वीकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडले होते. मात्र तालुका कृषी अधिकारी फरार झाले होते. न्यायालयाच्या निर्णयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्याचे समजते.