अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 08:18 IST2025-11-04T08:18:22+5:302025-11-04T08:18:58+5:30
एसटी बस बंद; दुहेरी संकटामुळे ग्रामस्थांची काेंडी

अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : अलिबाग-रोहा रस्त्यावरील खानाव वढाव येथील पूल सोमवारी कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे रोजच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. तसेच चौलमार्गे अंदोशी येथील मोरी तुटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. या दुहेरी संकटामुळे नागरिकांची कोंडी झाली होती.
अलिबाग-रोहा रस्त्यावर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वढाव येथील पुलाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण खचला आहे. आधीच अलिबाग रोहा रस्त्यावर नवेघर आणि सुडकोली येथील पूल निकामी झाल्याने अलिबाग रोहा एसटी बस बंद करण्यात आलेली आहे. अलिबाग आगारातून अलिबाग ते महानपर्यंत बस सोडली जात होती. त्यामुळे काहीसा दिलासा प्रवाशांना मिळाला होता. एसटी विभागाने बामणगावपर्यंत बस सोडली आहे. अलिबाग एसटी स्थानकात रामराजकडे जाणारे प्रवासी एसटीची वाट पाहत होते. त्यामळे गर्दी झाली होती. एसटी सुटणार नसल्याने पर्यायी वाहनाने प्रवासी पुढील प्रवासासाठी निघाले.
पर्यायी मार्गावरील पूलही खचल्याने प्रवाशांचे हाल
वढाव येथील पूल आणि रस्ता खचल्याने अलिबाग रोहा हा पूर्णतः रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे वावे, रामराज येथील प्रवाशांचे हाल होणार आहेत.
पर्यायी मार्ग असलेल्या चौलमार्गे वावे ते महान या रस्त्याने वाहतूक सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, आंदोशी येथीलही पूल खचल्याने या मार्गाने जाणारी वाहतूकही बंद आहे.