दिवेआगरला स्विमिंग पूलमध्ये पडून मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 12:50 IST2023-05-20T12:49:51+5:302023-05-20T12:50:10+5:30
आविष्कार अविनाश येळवंडे असे मुलाचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सावरदारी गावातील येळवंडे कुटुंबीय व मित्रपरिवार पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते.

दिवेआगरला स्विमिंग पूलमध्ये पडून मुलाचा मृत्यू
दिघी : दिवेआगर येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाच वर्षांच्या मुलाचा बुधवारी रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये पडून बुडून मृत्यू झाला.
आविष्कार अविनाश येळवंडे असे मुलाचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सावरदारी गावातील येळवंडे कुटुंबीय व मित्रपरिवार पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. पहिल्या दिवशी दिवेआगर समुद्रकिनारी फिरून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश येळवंडे गाडी धुण्यासाठी आले. त्यांचा मुलगा आविष्कार हाही यांच्यासोबत आला होता.
गाडी धुताना आविष्कार रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये पडला. मात्र, हा प्रकार अविनाश यांच्या लक्षात आला नाही. थोड्या वेळाने आविष्कार दिसत नसल्याने त्याचा शोध घेतला असता, तो स्विमिंग पूलमध्ये पडल्याचे आढळून आले. त्याला बाहेर काढून त्वरित बोर्ली पंचतन येथील शासकीय रुग्णालयात नेत वैद्यकीय तपासणी केली. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत दिघी सागरी पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सहायक पाेलिस निरीक्षक प्रसाद ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहायक उपनिरीक्षक सचिन निमकर तपास करीत आहेत.