बोट अॅम्ब्युलन्स सेवा लवकरच कार्यान्वित होणार, पालकमंत्री आदिती तटकरेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 16:49 IST2020-08-09T16:49:11+5:302020-08-09T16:49:55+5:30
ही बोट अॅम्ब्युलन्स सेवा प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित केली जाणार आहे.

बोट अॅम्ब्युलन्स सेवा लवकरच कार्यान्वित होणार, पालकमंत्री आदिती तटकरेंची माहिती
रायगड : मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल मेडीकल युनिटसह बोट अॅम्ब्युलन्स सेवा बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
याबाबतचा शासन निर्णय दि.7 ऑगस्ट 2020 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी विशेष आभार मानले आहेत.
ही बोट अॅम्ब्युलन्स सेवा प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित केली जाणार आहे. मेडीकल युनिटसाठी लागणारी बोट, यंत्रसामुग्री, औषधे, कर्मचारीवर्ग, इंधन खर्च हे सर्व खर्च नेमण्यात येणाऱ्या बाह्य यंत्रणेकडून करण्यात येतील. काम सुरू झाल्यावर प्रति महिना परिचालन खर्चाचे देयक या बाह्य यंत्रणेस सरकार कडून अदा करण्यात येईल. बाह्य यंत्रणेची सेवा घेण्याबाबतचे दर निविदा प्रक्रियेअंती निश्चित करण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक जलद आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.