कर्जत येथे भाजपचे चून-भाकर आंदोलन; पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पोहोचली नसल्याने शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 00:08 IST2020-11-14T00:07:47+5:302020-11-14T00:08:01+5:30
पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पोहोचली नसल्याने शासनाचा निषेध

कर्जत येथे भाजपचे चून-भाकर आंदोलन; पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पोहोचली नसल्याने शासनाचा निषेध
कर्जत : महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. आजपर्यंत तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यापर्यंत शासनाची मदत पोहोचली नाही. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत तहसीलदार कार्यालयाबाहेर चुन्नाची डबी आणि भाकरी अधिकाऱ्यांना देण्याचे आगळेवेगळे आंदोलन केले.
कर्जत तालुक्यातील सरत्या पावसाने केलेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना शासनाने अद्याप मदत केली नाही तर काही शेतकऱ्यांच्या भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे केले नाहीत, असा आरोप करीत १३ नोव्हेंबर रोजी कर्जत तहसील कार्यालय येथे चुना आणि भाकरी हे सोबत आणून आंदोलन केले.
भारतीय जनता पक्ष आणि भाजप किसान मोर्चा यांच्या माध्यमातून केलेल्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाला भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी मोठी गर्दी केली होती. भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, आयोजक भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे, जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे यांच्यासह आदी प्रमुख उपस्थित होते.