सौंदर्य हृदयापासून सुरू होऊन कर्तृत्वापर्यंत संपते
By Admin | Updated: March 14, 2016 01:55 IST2016-03-14T01:55:07+5:302016-03-14T01:55:07+5:30
सौंदर्य म्हणजे केवळ शरीराची सुंदरता नव्हे, तर खरे सौैंदर्य हे हृदयापासून सुरू होते आणि कर्तृत्वापर्यंत संपते, हे मला अनेक महनीय व्यक्तींच्या सहवासातून, संपर्कातून उमगले आहे

सौंदर्य हृदयापासून सुरू होऊन कर्तृत्वापर्यंत संपते
खोपोली : सौंदर्य म्हणजे केवळ शरीराची सुंदरता नव्हे, तर खरे सौैंदर्य हे हृदयापासून सुरू होते आणि कर्तृत्वापर्यंत संपते, हे मला अनेक महनीय व्यक्तींच्या सहवासातून, संपर्कातून उमगले आहे. त्यांच्याकडील अनेक आठवणी हीच आपली मर्मबंधातली ठेव असल्याचे प्रतिपादन ‘श्वास’ चित्रपटाच्या लेखिका, साहित्यिका माधवी घारपुरे यांनी खोपोलीत बोलताना केले.
खोपोलीतील अभिनव व्याख्यानमालेत घारपुरे बोलत होत्या. काटकसर करणे म्हणजे कंजुसी करणे नव्हे, पैशांची बचत करणे म्हणजे कंजुसी करणे नव्हे, असे सांगून माधवी घारपुरे यांनी पु. ल. देशपांडे, सुनीती देशपांडे, ईश्वरचंद्र विद्यासागर, पं. मदनमोहन मालवीय यांच्या जीवनातील काही उदाहरणे सांगितली. भोगाच्या लालसेने वेळ, शक्ती आणि पैैसे खर्च करणे ही उधळपट्टीच असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. आपल्यासारखी माणसे, आपण दया दाखवतो परंतु बाबा आमटेंसारखा महान व्यक्ती हा करुणा करणारा असतो, असे सांगून त्यांनी एक दाखलाही दिला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही, संघर्षही जीवन का दुसरा नाम हैं, असे आपल्याला सांगितल्याची आठवणही घारपुरे यांनी सांगितली.
याप्रसंगी नगर परिषदेच्या आरोग्य सभापती माधवी रिहे, ब्राह्मण सभा अध्यक्ष नरेंद्र हर्डीकर, उपाध्यक्षा अनिषा बिवरे, कार्यवाह अनिल रानडे इ. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. (वार्ताहर)