कर्जत : मुंबई-पुण्याच्या मध्यवर्तीचे ठिकाण म्हणून कर्जतची ओळख आहे. तिसरी मुंबई म्हणून कर्जत तालुका झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांमुळे शहरात रहदारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर उपाय म्हणून कर्जत नगर परिषद, वाहतूक नियंत्रण अधिकारी (आरटीओ) आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने कर्जत शहरातील पार्किंग आणि रहदारीविषयी आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर आता अंमलबजावणी सुरु केली आहे, त्यामुळे कुठेही आणि कशीही वाहने उभी करणाऱ्यांनो सावधान, तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. शहराच्या मुख्य बाजारपेठेत होणारी ट्रॅफिक हा आता कर्जतकरांचा रोजचाच त्रास झाला आहे. यामुळेच नगरपरिषदेने ट्रॅफिक जामवर उपाययोजना ठरविली आहे. कर्जत नगर परिषद, वाहतूक नियंत्रण अधिकारी (आरटीओ) आणि कर्जत पोलीस ठाण्याच्यावतीने कर्जत शहरातील वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. वाहने पार्किंगसाठी जागा म्हाडा कॉलनीजवळील खुली जागा, शनी मंदिरालगती खुली जागा, डेक्कन जिमखाना येथील अभिजित मुधोळकर यांची जागा, तहसीलदार यांच्या बंद बंगल्यासमोरील जागा, कचेरी रोड येथील सप्रे यांच्या शेजारील रस्ता आणि आमराई मैदानालगतची जागा या ठिकाणी तुम्ही वाहने उभी करू शकता. ज्या रस्त्यावर नगरपरिषदेचे सूचना फलक लावले आहेत ते रस्ते वाहन चालकांना ये- जा करण्यासाठी वापरात येतील. काही रस्ते हे पार्किंग -१ आणि पार्किंग -२ जाहीर केले आहेत, त्याप्रमाणेच वाहने उभी राहतील अन्यथा वाहनांवर कारवाई करण्यात येईल. आमराई येथून स्मशानभूमी, आशीर्वाद हॉटेल, इंग्लिश मिडीयम स्कूल , नदी घाट , मस्जीद- जैन मंदिर, महावीर पेठ ते रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशन, मयुरा हॉटेल,पोस्ट आॅफिस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, युनियन बँक, म्हाडा कॉलनी ते सुरभी ज्वेलर्स अशी एकेरी वाहतूक प्रस्तावित करण्यात आली आहे. (वार्ताहर)नियम मोडल्यास कारवाई : कर्जत शहरात अनेक ठिकाणी रिक्षा चालकांनी रिक्षा स्टँड तयार केले आहेत मात्र आता त्यांना नेमून दिलेल्या रिक्षा स्टँडवर आपल्या रिक्षा उभ्या करता येतील नाहीतर त्यांच्यावर सुध्दा कारवाई होणार आहे. तसेच हातगाड्या, फळ विक्र ते, भाजी विक्र ेते यांनी फिरता व्यवसाय करायचा आहे, त्यांना आपल्या हातगाड्या पार्किंग -१ आणि पार्किंग -२ प्रमाणेच फिरवाव्या लागतील.स्कूल बससाठी थांबे : स्कूल बससाठी सुध्दा थांबे ठरवून दिले आहे. त्यापैकी नगरपरिषद कार्यालयाजवळ, महावीर पेठ, जैन मंदिर, म्हाडा कॉलनी कोतवाल नगरजवळ, पोस्ट आॅफिसजवळ याच ठिकाणी स्कूल बस उभ्या कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. मोटारसायकल, मोटार या अन्य ठिकाणी उभ्या केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
रस्त्यावर वाहने लावणाऱ्यांनो सावधान!
By admin | Updated: September 16, 2015 23:53 IST