इतिहासाचा साक्षीदार बापटवडा जमीनदोस्त; धोकादायक ईमारतीमुळे पालिकेची कारवाई
By वैभव गायकर | Updated: November 4, 2022 19:19 IST2022-11-04T19:18:56+5:302022-11-04T19:19:28+5:30
पनवेल शहरातील इतिहासाचा साक्षीदार असलेला बापटवडा जमीनदोस्त करण्यात आला आहे.

इतिहासाचा साक्षीदार बापटवडा जमीनदोस्त; धोकादायक ईमारतीमुळे पालिकेची कारवाई
पनवेल: पनवेल शहराला तलावांचे शहर म्हणून वेगळी ओळख आहे. या व्यतिरिक्त शहरातील ऐतिहासिक वाडे ही देखील शहराची एक ओळख आहे. कालांतराने या वाड्यांची जागा टोलेजंग ईमारती घेत आहेत. यापैकीच एक पेशवेकालीन बापटवडा पालिकेने शुक्रवार दि.4 रोजी जमीनदोस्त केला. धोकादायक असल्याने पालिकेने पोलिसांच्या फौजफाट्यासह जमीनदोस्त केला. पेशवेकालीन हा वाडा चिमाजी आप्पा यांनी वसईच्या स्वारीवेळी पनवेल याठिकाणी बांधला होता. या वाड्याला जवळपास 300 वर्ष झाली. शहरातील ऐतिहासिक गोकुळाष्टमीचा सण या वाड्यात कित्येक वर्षापासून साजरा होतो.
सध्याच्या घडीला या वाड्यात 12 भाडेकरू वास्तव्यास होते. मात्र वाडा धोकादायक झाल्याने पालिकेने दीड महिन्यापूर्वी भाडेकरूंना नोटिसा बजावुन घरे खाली करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार आज दि.4 रोजी वाडा जमीनदोस्त करण्यात आला. पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाच्या उपस्थित एक जेसीबीच्या सहाय्याने हा वाडा जमीनदोस्त करण्यात आला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा देखील उपस्थित होता अशी माहिती प्रभाग अधिकारी अमर पाटील यांनी दिली. पनवेल शहर कात टाकत आहे. मात्र बापट वाड्यासारखा शहरातील ऐतिहासिक वारसा नष्ट होत चालला आहे.