अती मुसळधार पावसाचे आगमन, दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट
By राजेश भोस्तेकर | Updated: September 29, 2023 16:17 IST2023-09-29T16:16:50+5:302023-09-29T16:17:54+5:30
२८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला पावसाचे आगमन विसर्जन मिरवणुकीला झाले. रात्रीच्या सुमारास मात्र पावसाने विश्रांती घेतली होती.

अती मुसळधार पावसाचे आगमन, दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट
अलिबाग : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी उन्हाळी वातावरण असताना दुपारनंतर पावसाचे विजांच्या कडकडाटासह जोरदार आगमन झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पुन्हा पावसाळी झाले आहे. हवामान विभागाने २९ व ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या दोन दिवसापासून दुपारनंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन होऊन जनजीवन विस्कळीत होत आहे. पाऊस सुरू झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला पावसाचे आगमन विसर्जन मिरवणुकीला झाले. रात्रीच्या सुमारास मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. शुक्रवारी दुपार पर्यंत उन्हाळी वातावरण निर्माण होऊन गर्मी होत होती. मात्र दुपारी साडे तीन नंतर अचानक वातावरण बदलून काळे ढग जमा होऊन अंधार पसरला. आणि काही वेळातच मुसळधार पावसाचे आगमन झाले. पावसासोबत विजांचा कडकडाटही सुरू झाला. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
हवामान विभागाने २९ आणि ३० सप्टेंबर असे दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे. ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार असून काही भागात अती मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार अलिबाग सह जिल्ह्यातील काही भागात अती मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पावसाळी झाले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.