गुरांची वाहतूक करणाऱ्यास अटक
By Admin | Updated: September 16, 2015 23:52 IST2015-09-16T23:52:10+5:302015-09-16T23:52:10+5:30
गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असताना मुंबई येथून कोकणात जाणाऱ्या वाहतुकीच्या गाड्यांवर पाली पोलिसांची नजर होती. विळे येथून भिरा पालीमार्गे येणाऱ्या इको

गुरांची वाहतूक करणाऱ्यास अटक
पाली : गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असताना मुंबई येथून कोकणात जाणाऱ्या वाहतुकीच्या गाड्यांवर पाली पोलिसांची नजर होती. विळे येथून भिरा पालीमार्गे येणाऱ्या इको व्हॅनवर संशय आल्याने पाली येथील महाकाली मंदिराजवळ उभी असलेली गाडी सोडून चालकासह चौघेजण पळाले. यावेळी इको व्हॅनमध्ये बेशुद्ध केलेली तीन जनावरे आढळून आली. या गाडीचा नंबर एमएच ०४ जीडी १९ असून ती पोलिसांनी जप्त केली आहे.
बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास विळे ता. माणगांव येथून या इको व्हॅनमध्ये दोन गायी व एक बैल यांना बेशुद्ध करून व्हॅनमध्ये भरण्यात आले. गाडीला सर्व बाजूंनी पडदे लावण्यात आले होते. ही गाडी भिरा पाली मार्गे मुंब्रा येथे घेवून जात असताना पाली येथील महाकाली मंदिराजवळ व्हॅनवर संशय आल्याने वाहतूक पोलिसांनी शिटी मारून गाडी थांबविण्यासाठी इशारा केला असताना चालकाने गाडी पाठीमागे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही गाडी जनावरांच्या वजनामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात घसरल्याने चालकासह सर्वजण घाबरले व तेथून गाडीमध्ये असलेले तिघे जण व चालक यांनी गाडी सोडून पळ काढला. ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करून पोलिसांनी त्यापैकी चालकाला पं.स. जवळ गणेश हॉटेलसमोर पकडले. बाकी तिघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले.
बेशुद्ध करण्यात आलेल्या जनावरांपैकी गाडीमध्येच एक बैलाचा मृत्यू झाला असून दोन गायी शुद्धीत आहेत. यांना पोलीस ठाण्यासमोर बांधण्यात आले आहे. आरोपी सर्वजण मुंब्रा येथील असून या जनावरांना मुंब्रा येथे नेण्यात येत होते. (वार्ताहर)