सर्पदंश मृत्यू प्रकरणी ठिय्या; ग्रामस्थांचे आंदोलन; वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 04:28 PM2023-07-30T16:28:00+5:302023-07-30T16:28:30+5:30
साराच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली.
पेण : तालुक्यातील जीते गावातील सारा रमेश ठाकूर हिचा सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. याबाबत विधानसभेतही आवाज उठवल्यानंतर शनिवारी जिते ग्रामस्थांनी पेण उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. साराच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली.
ग्रामस्थांसह पेणच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. उपजिल्हा रुग्णालयासमोर तब्बल दोनशे ते तीनशे महिला व पुरुष यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. पेण पोलिस यंत्रणेतर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून, जिते प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद पाटील व पेण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती पाटील या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास देशमाने, अतिरिक्त शल्यचिकित्सक शीतल जोशी व पेण रुग्णालयाच्या प्रमुख संध्या राजपूत यांनी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत दिले आहे.
मंगळवारी बैठक
येत्या मंगळवारी पेण उपजिल्हा रुग्णालयात कोकण सहआयुक्त भेट येणार आहेत. त्याप्रसंगी आंदोलक ग्रामस्थ, राजकीय क्षेत्रांतील मान्यवर मंडळी व प्रशासन यांची संयुक्त बैठक होईल. यावेळी गैरसोय व जबाबदारी यांबाबत दिलेल्या निवेदनात उणीवांवर चर्चा होणार आहे.