खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप
By Admin | Updated: February 27, 2016 01:19 IST2016-02-27T01:19:35+5:302016-02-27T01:19:35+5:30
तालुक्यातील पोयनाड येथील मयूरेश अजित गंभीर याला सचिन सुरेश तावडे यांचा खून केल्याप्रकरणी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयातील प्रमुख सत्र न्यायाधीश एस. एम. मोडक

खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप
अलिबाग : तालुक्यातील पोयनाड येथील मयूरेश अजित गंभीर याला सचिन सुरेश तावडे यांचा खून केल्याप्रकरणी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयातील प्रमुख सत्र न्यायाधीश एस. एम. मोडक यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
१३ आॅगस्ट २००७ ला मृत सचिन तावडे हा नेहमीप्रमाणे सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास पोयनाडमधीलच एका पतपेढीत कामाला जाऊन सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घरी परत आला. त्यावेळी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मयूरेश अजित गंभीर हा पल्सर मोटारसायकलवरून सचिनच्या घराजवळ आला व त्याचे वडील सुरेश तावडे यांना सचिन आहे का, असे विचारले. त्यावेळी वडिलांनी सचिन यास तुला कोणीतरी विचारत आहे, असे सांगितले. त्यावेळी सचिन घरातून बाहेर आला असता, आरोपी क्र. २ मयूरेश गंभीर याने त्याच्याजवळील पिस्तुलाने सचिन यांच्या अंगावर गोळी झाडली. त्यामुळे सचिन खाली पडला व त्याचा मृत्यू झाला.
या मारहाणीच्या घटनेनंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली. या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील प्रमुख सत्र न्यायाधीश एस. एम. मोडक यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे माजी अति. शासकीय अभियोक्ता अॅड. एन.जी. ठाकूर यांनी खटल्याचे कामकाज चालवून एकूण १९ साक्षीदारांचे पुरावे नोंदविले होते.
या खटल्याचा युक्तिवाद अति. शासकीय अभियोक्ता अॅड. जितेंद्र द. म्हात्रे यांनी प्रभावीपणे केला. युक्तिवाद करताना त्यांनी न्यायालयात सुप्रीम कोर्टाचे एकूण १५ महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दाखल केले. रणजित कांतीलाल जैन व गणेश हिराजी देवरुखकर या दोघांना पुरेशा पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
(विशेष प्रतिनिधी)
पूर्वीच्या भांडणाचा राग
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी क्र.१ रणजीत जैन यांचे व सचिन तावडे यांचे घटनेच्या पूर्वी भांडण झाले होते व सचिन याने त्यास मारहाणदेखील केली होती. तेव्हापासून आरोपी क्र. १ च्या मनात सचिनविरुद्ध राग होता. त्यामुळे आरोपी रणजीत जैन याने पूर्वीच्या भांडणाचा रोष मनात धरून त्याचा मित्र आरोपी क्र. २ मयूरेश अजित गंभीर व आरोपी क्र. ३ गणेश हिराजी देवरुखकर यांच्याशी संगनमत करून सचिन सुरेश तावडे यास मारण्यास सांगितले.