महामार्गावर ट्रकला अपघात, चालक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 00:49 IST2020-01-10T00:49:36+5:302020-01-10T00:49:43+5:30
मागील वर्षात मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात झालेल्या वावंढळ पुलावर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ट्रकला अपघात झाला.

महामार्गावर ट्रकला अपघात, चालक गंभीर जखमी
मोहोपाडा : मागील वर्षात मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात झालेल्या वावंढळ पुलावर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ट्रकला अपघात झाला. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी ट्रकमधील कापूस ट्रकसहित खाक झाल्याची घटना घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी असून, मृत्यूशी झुंज देत आहे.
टोलवसुली करणाºया मार्गावर संबंधित यंत्रणेचा निष्काळजीपणा जीवावर बेतत आहे. मुंबई-पुणे जुन्या मार्गावर खोपोलीहून पनवेलच्या दिशेने जाताना वावंढळ गावानजीक ओढ्यावर पूल आहे. पुलाच्या अगोदर वळणदार रस्ता आणि अरुंद पूल यामुळे वाहनचालकांना पुलाचा अंदाज येत नसून, पुलाचा कठडा तोडून अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. मागील वर्षात पुलावर ५० पेक्षा जास्त अपघात घडले आहेत. जुलै २०१९ मध्ये लागोपाठ पाच अपघात पुलावर घडून दोन बळी गेले तर आठ गंभीर जखमी झाल्यानंतर आयआरबीकडून पुलाच्या सुरुवातीला पिंप आणि सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती; परंतु तात्पुरती मलमपट्टी आता निघाली असून, सिग्नल बंद तर पिंपही जागेवर नाहीत. यामुळे अपघातांनी डोकेवर काढले असून कापूस घेऊन जाणारा ट्रक पुलाचे कठडे तोडून ओढ्यात कोसळला. यामध्ये ट्रक चालक (नाव समजले नाही) गंभीर जखमी झाला असून, त्यातील कापूस खाक झाला आहे. या वेळी खोपोली अग्निशमन दलाच्या जवानांनी बुधवारी ४.३० वाजण्याच्या सुमारास लागलेली आग शर्थीचे प्रयत्न करून तासाभरात आटोक्यात आणली.