कर्जत स्थानकातील स्टॉलवर वडापावमध्ये सापडला साबणाचा तुकडा, प्रवाशाच्या तोंडातून आला फेस; रेल्वे प्रशासनाने स्टॉल केला बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 04:54 IST2025-04-03T04:52:31+5:302025-04-03T04:54:25+5:30
Karjat Railway Station 2025: रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील व्ही. के. जैन टी स्टॉलवरून घेतलेल्या वडापावमध्ये साबणाचा वापरलेला तुकडा आढळल्याची तक्रार येताच रेल्वे प्रशासनाने स्टॉलधारकावर तातडीने कारवाई केली आहे.

कर्जत स्थानकातील स्टॉलवर वडापावमध्ये सापडला साबणाचा तुकडा, प्रवाशाच्या तोंडातून आला फेस; रेल्वे प्रशासनाने स्टॉल केला बंद
कर्जत - रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील व्ही. के. जैन टी स्टॉलवरून घेतलेल्या वडापावमध्ये साबणाचा वापरलेला तुकडा आढळल्याची तक्रार येताच रेल्वे प्रशासनाने स्टॉलधारकावर तातडीने कारवाई केली आहे. मुंबई ते कर्जत प्रवास करणाऱ्या खोपोली येथील महिला रशिदा घोरी आणि त्यांच्या दोन मुलांनी मंगळवारी, १ एप्रिलला प्रवासादरम्यान वडापाव खाल्ल्यानंतर डिटर्जंटयुक्त फेस तोंडात आल्यामुळे हा गंभीर प्रकार समोर आला आहे.
मुलांच्या पोटात मळमळल्यासारखे झाल्यानंतर खात असलेल्या वडापावची त्यांनी पडताळणी केली असता त्यात साबणाचा विरघळलेला तुकडा सापडला. त्यानंतर त्यांनी तातडीने प्लॅटफॉर्म नंबर दोनवरील अधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते व्ही. के. जैन टी स्टॉल यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यावर स्टॉलधारकाने उद्धटपणे उत्तर देत टाळाटाळ करण्याचा प्रकार केला. त्यानंतर रशिदा घोरी यांनी कर्जत स्टेशन उप प्रबंधक यांच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. बुधवारी, २ एप्रिलला या प्रकरणाची सविस्तर पडताळणी करण्यासाठी तक्रारदार महिला कर्जत स्टेशन उपप्रबंधक कार्यालयात गेली असता व्ही. के. जैन टी स्टॉलधारकाने तक्रारीचे निराकरण न करता तुम्ही आमच्याकडून घेऊन दुसरीकडे तो खाल्ला. त्यामुळे ते आम्ही पाहिले नाही, असे बेजवाबदारपणे उत्तरे दिले.
रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रेल्वे स्थानकांतील सर्व बेजबाबदार खाद्यपदार्थ विक्रेत्या स्टॉलधारकांची तपासणी करण्यात यावी. योग्य पद्धतीने खाद्यपदार्थ बनविले जातात की नाही ? नियमानुसार खाद्यपदार्थ विक्री केली जाते की नाही ? खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदात दिले जातात की पांढऱ्या कागदात ? या सर्व बाबींची रेल्वे प्रशासनाने सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.
- प्रभाकर गंगावणे, सचिव, कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन
विक्री परवाना रद्द करावा
सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर तक्रारदार घोरी कुटुंबाने रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करीत ही माहिती देऊन कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनाही या प्रकाराबाबत माहिती दिली.
त्यानंतर गंगावणे यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर तक्रार करून व्ही. के. जैन टी स्टॉलधारकाच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून त्याचा विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी केली.
घटनेची तातडीने दखल घेत केली कारवाई
रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर तक्रार येताच मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनेची दखल घेत व्ही. के. जैन टी स्टॉलधारकाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाचे कमर्शियल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे आणि कर्जत रेल्वे स्थानक प्रबंधक प्रभास कुमार लाल यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार व्ही. के. जैन टी स्टॉलचे शटर पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केले.