३५ फुटांवरून कोसळलेली कार आदळली मालगाडीवर, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 07:35 AM2023-11-08T07:35:46+5:302023-11-08T07:36:05+5:30

या अपघातात धर्मानंद यशवंत गायकवाड (वय ४१, रा. नेरळ), मंगेश मारिया जाधव (४६, रा. मुंबई), नितीन मारुती जाधव (४८, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला.

A car that fell from a height of 35 feet hit a freight train, three died on the spot in a horrific accident | ३५ फुटांवरून कोसळलेली कार आदळली मालगाडीवर, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

३५ फुटांवरून कोसळलेली कार आदळली मालगाडीवर, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

कर्जत : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर मंगळवारी पहाटे भीषण व विचित्र अपघात झाला. कर्जतहून नेरळकडे जात असताना रेल्वे पुलाचा कठडा तोडून कार ३५ फूट खाली कोसळली. दुर्दैव असे की, याच वेळी रेल्वे रुळावरून एक मालगाडी जात होती. त्यावर ती कार आदळली. या अपघातात एका पत्रकारासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी असून, त्यातही एका पत्रकाराचा समावेश आहे. जखमींना प्रथमोपचार करून पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात धर्मानंद यशवंत गायकवाड (वय ४१, रा. नेरळ), मंगेश मारिया जाधव (४६, रा. मुंबई), नितीन मारुती जाधव (४८, रा. मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. संताेष सखाराम जाधव (३८, रा. नेरळ) आणि जयवंत रामचंद्र हबाळे (४३, रा. बेकरे) हे जखमी आहेत. अपघातात ठार झालेले धर्मानंद गायकवाड हे मूळचे कर्जत तालुक्यातील असून, ते नेरळमधील राजेंद्रगुरुनगरमध्ये वास्तव्यास होते. ते स्थानिक वर्तमानपत्रासाठी काम करीत होते. धर्मानंद हे नेरळ येथून आपले काम आटोपून मंगेश, नितीन या दोन मावस भावांसह व संताेष आणि जयवंत या मित्रांसमवेत कार (एमएच ४६ बीआर ४२६१) ने कर्जत-कल्याण राज्य मार्गावरून जात होते.  किरवली गावानजीक आले असता गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची कार रेल्वे पुलाचे सुरक्षा कठडे तोडून ३५ फूट खाली कोसळली. त्याचवेळी पुलाखालून पनवेलहून कर्जतकडे मालगाडी जात होती. कार त्या मालगाडीवर आदळली आणि तिघांनी आपला जीव गमावला.

मालगाडीचे तीन डबे झाले वेगळे
हा अपघात इतका भीषण होता की, कार जोरात आपटल्याने मालगाडीच्या शेवटच्या तीन डब्यांचे दोन कपलिंग तुटले व धावणाऱ्या मालगाडीपासून तीन डबे वेगळे  झाले. या अपघाताची माहिती समजताच पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग पहाटे चार ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत बंद होता. त्यानंतर रुळांची तपासणी करून रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला.

Web Title: A car that fell from a height of 35 feet hit a freight train, three died on the spot in a horrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.