अलिबाग : बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी रोखण्याकरिता २०१३ पासून रायगड पोलीस दलाने राबवलेल्या शोधमोहिमेमुळे मागील दोन वर्षांत एकही बांगलादेशी नागरिक रायगडमध्ये आढळून आलेला नाही. परंतु त्यापूर्वी बेकायदेशीरपणे रायगड जिल्ह्यात वास्तव्यास राहिलेल्या ४१ बांगलादेशींना शोधून काढून गुन्हे दाखल करण्यात आले होते.
बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर २०१३ मध्ये बांगलादेशी घुसखोर नागरिक विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १६ गुन्हे दाखल केले आहेत, तर ४१ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यापैकी ३३ जणांना बांगलादेशात परत पाठवले तर चार जणांची जामिनावर न्यायालयाने मुक्तता केली आहे.
परवानगीशिवाय भारतात राहणाऱ्या नागरिकांना शोधण्यासाठी गृहविभागाने बांगलादेशी विरोधी पथकाला विशेष अधिकार देवून शोधमोहिमा राबवण्यासाठी आदेश दिले होते. रेल्वे स्थानक परिसरात हे नागरिक जास्त दिसतात. मागील तीन वर्षांत १७४ शोधमोहिमा पथकाने राबवल्या असून, तीन बांगलादेशी नागरिक आढळले आहेत. कारखान्यांमधील लेबर कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिकांकडे हे नागरिक काम मागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रायगड जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती पोलिसांना कळवण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. तसेच मोहल्ला बैठका घेऊ न अशा नागरिकांची माहिती कळवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
परराज्यातून येणाºया संशयित कामगारांची कागदपत्रे नियमित तपासली जातात. पश्चिम बंगालमधून आलेल्या नागरिकांची बोलीभाषा आणि बांगलादेशातील नागरिकांच्या भाषेत साम्य आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील नागरिकांवर जास्त नजर असल्याची माहिती बांगलादेशी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद माने यांनी दिली आहे.