सायबर क्राइम रोखण्यासाठी ३० कर्मचाऱ्यांची ब्रिगेड
By Admin | Updated: August 3, 2015 03:49 IST2015-08-03T03:49:18+5:302015-08-03T03:49:18+5:30
रायगड जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी रायगड पोलीस प्रशासनाने ३० तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची ब्रिगेड तयार केली आहे

सायबर क्राइम रोखण्यासाठी ३० कर्मचाऱ्यांची ब्रिगेड
अलिबाग : रायगड जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी रायगड पोलीस प्रशासनाने ३० तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची ब्रिगेड तयार केली आहे. शुक्रवारी त्यांना रायगडच्या सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी प्रशिक्षण दिले.
सध्या एटीएम फ्रॉड, फेक कॉल्स््, फेसबुक, व्हॉटस् अॅप, या सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना फसविण्याचा त्यांना लुबाडण्याचा प्रकार मोठ्या संख्येने होत आहे. २०१४ साली २७ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचप्रमाणे १ जानेवारी ते ३१ जुलै २०१५ या कालावधीत २४ गुन्ह्यांची नोंद पोलिसात झाली आहे. पाच गुन्हे उघडकीस आणण्यात सायबर सेल विभागाला यश आले आहे.
सायबर क्राइमचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर अलिबाग येथे टीम कार्यरत आहे. मात्र जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अशी टीम पूर्ण वेळ काम करणारी अस्तित्वात नव्हती. प्रत्येक पोलीस ठाण्यात काही प्रमाणात सायबर क्राइमच्या तक्रारी येत आहेत. परंतु तेथील कर्मचाऱ्यांना सायबर क्राइमच्या गुन्ह्यात काय करायला पाहिजे याचे कायदेशीर ज्ञान नव्हते.
रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहमद सुवेझ हक यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यातील किमान एका पोलीस कर्मचाऱ्याला सायबरबाबत ट्रेनिंग देण्याचे ठरविले होते. (प्रतिनिधी)