मधुकर ठाकूर
उरण : जागतिक वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या एलिफंटा बेटावर चार महिन्यांपासून सुरू असलेल्या उत्खननात दगड आणि विटांनी बांधलेले १,५०० वर्षांहून अधिक जुने असलेले जलाशय व विविध जुन्या वस्तू सापडल्या आहेत. या पुरातन, दुर्मीळ वस्तू व संशोधनामुळे बेटावरील ऐतिहासिक पाऊलखुणा प्रकाशात येणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (एएसआय) अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांनी दिली.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (एएसआय) एक पथक अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली एलिफंटा बेटावर चार महिन्यांपासून मोराबंदर परिसरात काम करत आहेत. उत्खननात शोध पथकाला एक आयताकृती जलाशय (टाके) आढळले. या जलाशयाला उत्तरेकडे पायऱ्यांचा एक लंबवत भाग जोडलेला आहे.
या रचनेमुळे बेटावरील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धती समोर येते. बंदरावरील उत्खननाचे काम आतापर्यंत ५ मीटर खोलीपर्यंत पोहोचले असून, यात २० पायऱ्या उजेडात आल्या आहेत. या पायऱ्या दगडांच्या ठोकळ्यांपासून बांधण्यात आल्या आहेत; विशेष म्हणजे, हे दगड एलिफंटा बेटावरील स्थानिक दगड नाहीत, असे आंबेकर सांगतात. तज्ज्ञांच्या मते, या वास्तूची तुलना 'पायऱ्यांच्या विहिरीं'शी होऊ शकते. विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळणाऱ्या अशा विहिरींशी-जिथे पायऱ्या उतरून गेल्यावर मध्यभागी असलेल्या मुख्य जलाशयापर्यंत पोहोचता येते. अशा प्रकारच्या वास्तू रचनेचा उगम सातव्या शतकात झाला असावा, असे मानले जाते.
उत्खननात काय आढळले ?
पुरातत्त्व शास्त्रज्ञांना इंडो-मेडिटेरेनियन (रोमन) अँफोराचे तुकडे, तसेच इतर आयातित सिरॅमिक्स आणि काचेच्या वस्तू सापडल्या. जे दूरच्या अंतरावरील विनिमय जाळ्यांमधील सहभाग दर्शवितात. या शोधांवरून असे दिसून येते की, एलिफंटा हे सागरी वाहतुकीच्या व्यापक जाळ्यांमध्ये एकीकृत होते. उत्खननात आयातित सिरॅमिक्सदेखील सापडले आहेत, ज्यात टाइझ ग्लेज्ड वेअरचे काही तुकडे आणि मेसोपोटेमियातील टॉपेंडो व भूमध्य सागरी प्रदेशातील अॅफोरा जार यांचे मिळून ३००० हून अधिक खापरांचे तुकडे आहेत. मेसोपोटेमियातील टॉपेंडो जार आणि भूमध्य सागरी अँफोरा ही प्राचीन काळातील महत्त्वाची सागरी व्यापारी जहाजे होती, ज्यातून वाइन, तेल आणि फिश सॉस यांसारख्या द्रव वस्तूंची वाहतूक केली जात असे. भूमध्य सागरी अँफोरा सुरुवातीच्या ऐतिहासिक काळापासून प्रचलित होते, तथापि टॉपेंडो जार नंतर (इ.स. दुसऱ्या/तिसऱ्या शतकात) उदयास आले. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण डांबराचे अस्तर असलेली, हँडल नसलेली व लांबट रचना होती. नाण्यांच्या संग्रहात ११ नाणी आढळली असून, यात सहा तांब्याची आणि पाच शिशाची आहेत. या परिसरातील तीन तांब्याच्या नाण्यांपैकी दोन नाणी कलचुरी घराण्यातील कृष्णराजांची असल्याची माहिती पुणे येथील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्थेचे प्रा. अभिजीत दांडेकर यांनी दिली.
Web Summary : Elephanta Island excavation reveals 1500-year-old reservoir, ancient artifacts. The discovery sheds light on the island's historical water management and trade links, uncovering imported ceramics and coins, indicating significant maritime activity.
Web Summary : एलिफेंटा द्वीप पर खुदाई में 1500 साल पुराना जलाशय और प्राचीन कलाकृतियाँ मिलीं। यह खोज द्वीप के ऐतिहासिक जल प्रबंधन और व्यापारिक संबंधों पर प्रकाश डालती है, जिसमें आयातित मिट्टी के बर्तन और सिक्के मिले हैं, जो महत्वपूर्ण समुद्री गतिविधि का संकेत देते हैं।