किल्ले रायगड मार्गाची रखडपट्टी, २५.६ किमीसाठी १४६.४ कोटींचा खर्च; शिवप्रेमी, प्रवाशांकडून संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 08:51 IST2024-12-06T08:51:06+5:302024-12-06T08:51:28+5:30
तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी हे काम अपूर्णावस्थेत आहे. यामुळे सर्वसामान्यातून संताप व्यक्त होत आहे.

किल्ले रायगड मार्गाची रखडपट्टी, २५.६ किमीसाठी १४६.४ कोटींचा खर्च; शिवप्रेमी, प्रवाशांकडून संताप
सिकंदर अनवारे
महाड : ऐतिहासिक रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या महाड-रायगड या २५.६ किमी रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यासाठी १४६.४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
रायगड किल्ल्याला दररोज हजारो पर्यटक, शिवप्रेमी भेट देतात. शिवराज्याभिषेक दिन आणि अन्य ऐतिहासिकदिनीही गडाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या पर्यटकांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने महाड-रायगड किल्ला मार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू केले. त्याला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी हे काम अपूर्णावस्थेत आहे. यामुळे सर्वसामान्यातून संताप व्यक्त होत आहे.
महाड-रायगड २५.६ किमी अंतराच्या रस्त्याच्या कामाचे कंत्राट कोटारकी आणि अक्षय कंपनीला देण्यात आले आहे. मार्गावर १४६.४ कोटी खर्च करण्यात येत आहे. पावसाळ्यात हे काम बंद होते. आता ते पुन्हा सुरू झाले आहे. फेब्रुवारी २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल.
-अभिजित झेंडे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग
मातीचा भराव खचला
या मार्गावरील कोंझर या ठिकाणी काही दिवसांपूर्वी निकृष्ट कामाचा नमुना समोर आला होता. काँक्रिटीकरणाच्या खाली मातीचा भराव खचल्याने काँक्रीट आणि माती भराव यामध्ये पोकळी निर्माण झाल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. अशीच अवस्था लाडवली आणि तेटघरदरम्यान झाली आहे. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.