पेण बँकेच्या ठेवीदारांकडून १०% ची वसुली
By Admin | Updated: September 15, 2015 23:20 IST2015-09-15T23:20:11+5:302015-09-15T23:20:11+5:30
पेण अर्बन बँकेतील १० हजार रुपयेपर्यंतच्या ठेवीदारांना जमा झालेल्या रकमेतून पैसे देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पेण बँकेच्या १८ शाखांमधून धनादेश देण्याचे

पेण बँकेच्या ठेवीदारांकडून १०% ची वसुली
खोपोली : पेण अर्बन बँकेतील १० हजार रुपयेपर्यंतच्या ठेवीदारांना जमा झालेल्या रकमेतून पैसे देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पेण बँकेच्या १८ शाखांमधून धनादेश देण्याचे काम सुरू झाले आहे. गेली पाच वर्षे बँकेत अडकलेले पैसे यंदाच्या गणपतीला मिळणार असल्याने ठेवीदारांच्या चेहऱ्यावरील आनंद संघर्ष समितीचे पदाधिकारी मिळालेल्या रकमेतून १० टक्के रक्कम सक्तीने घेत असल्याने काहीकाळच टिकत असून ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
रायगड जिल्ह्यातील ७५ वर्षांची परंपरा असलेली पेण अर्बन बँक पाच वर्षांपूर्वी बंद झाली. यामुळे ठेवीदारांचे करोडो रुपये बँकेत अडकले होते. गेली पाच वर्षे हे पैसे मिळावेत म्हणून ठेवीदारांचा संघर्ष सुरू आहे. बँकेच्या रायगड जिल्ह्यात १६ व मुंबईत दोन शाखा होत्या. यातील खोपोली, शिळफाटा व कर्जतमधील शाखांमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम मोठी आहे. गरीब कुटुंबातील अनेकांनी आपली आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवली होती. लहान व्यावसायिकांनीही आपले पैसे बँकेत गुंतवले होते. बँक बंद झाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. बँक बंद होवून पाच वर्षे झाल्याने आपले पैसे मिळतील ही आशाच ठेवीदारांनी सोडली होती. मात्र पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे न्यायालयाने जमा झालेल्या रकमेतून १० हजार रुपयापर्यंत ठेवी असलेल्या छोट्या ठेवीदारांना पैसे देण्याचे आदेश दिल्याने ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बँकेत गेल्यानंतर मिळालेल्या रकमेतून संघर्ष समिती १० टक्के रक्कम घेत असल्याने ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. संघर्ष समितीने विविध ठिकाणी घेतलेल्या बैठकांमध्ये खर्च करण्यासाठी अशा प्रकारे पैसे घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तरीही लहान ठेवीदारांचा १० टक्के रक्कम देण्यास विरोध आहे. न्यायालयीन प्रक्रि येसाठी ही रक्कम घेत असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे असून १० हजाराच्या आतील ठेवीदारांकडून पैसे घेण्यापेक्षा मोठ्या रकमेच्या ठेवीदारांकडून ही रक्कम घेण्यात यावी असे अनेक लहान ठेवीदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. बँकेच्या सर्व शाखांमध्ये सक्तीने ही रक्कम घेतली जात असल्याने ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
पेण बँकेच्या १८ शाखांमध्ये सुमारे ६३२ कोटी रूपये अडकले आहेत. हे पैसे मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळेच लहान ठेवीदारांना आपली रक्कम परत मिळत आहे. न्यायालयीन प्रक्रि येला मोठा खर्च येत असल्याने ही रक्कम ठेवीदारांकडून घेतली जात आहे. यासाठी कुठलीही सक्ती करण्यात येत नाही.
- चिंतामण पाटील, सदस्य-पेण अर्बन बँक संघर्ष समिती