इंदापूर : इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत शांतता व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया पार पडली. अंतिम मतदानाची आकडेवारी उशिरा जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ४१, तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण ३ लाख २१ हजार २ मतदारांसाठी जिल्ह्यात सर्वाधिक ४०० मतदान केंद्र उभारण्यात आली होती. याठिकाणी सुमारे २ हजार ४५० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांनी ९ वाजण्याच्या सुमारास बावडा येथे मतदानाचा हक्क बजावला. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी दुपारी १ वाजता रुई येथे मतदान केले. सायंकाळी साडेपाच वाजता अधिकृत मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली. मात्र काही प्रमुख गावांतील मतदान केंद्रांवर उपस्थित असलेल्या मतदारांचे मतदान सहा वाजेपर्यंत पूर्ण करून घेण्यात आले.
डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या निवडणुकीत मात्र एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपसह अन्य पक्षांची मोट बांधणारे प्रदीप गारटकर व प्रवीण माने हे भाजपच्यावतीने प्रमुख भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले होते.
कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून दत्तात्रय भरणे यांना आव्हान देणारे हर्षवर्धन पाटील यावेळी त्यांच्याच खांद्याला खांदा लावून निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत दोन्ही नेत्यांची दुसरी पिढीही आपले राजकीय भविष्य आजमावताना दिसली. त्यांच्यासह आप्पासाहेब जगदाळे यांचे सुपुत्रही आपल्या राजकीय कारकिर्दीतील पहिल्या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
दरम्यान, बदलत्या युती व आघाड्यांमुळे मतदार व कार्यकर्ते काहीसे संभ्रमात असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे तालुक्यात भावनिक वातावरण होते. बहुतांश मतदार अजित पवार यांना आदरांजली वाहण्याच्या मन:स्थितीत असल्याचे दिसून आले. हा कल लक्षात घेऊन दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचारात अजित पवार यांच्या आठवणी व कार्यकाळाभोवती प्रचाराची दिशा ठेवली होती. कोणाला कितपत यश मिळेल याचे गणित आता मतपेटीत बंद झाले आहे.
Web Summary : Indapur witnessed peaceful ZP and Panchayat Samiti elections. Political heavyweights, including former ministers, cast their votes. Shifting alliances and the recent passing of Ajit Pawar influenced the campaign, with parties focusing on his legacy. Results are awaited.
Web Summary : इंदापूर में जिला परिषद और पंचायत समिति के चुनाव शांतिपूर्ण ढंग से संपन्न हुए। पूर्व मंत्रियों समेत कई राजनीतिक दिग्गजों ने मतदान किया। बदलते गठबंधनों और अजित पवार के निधन का चुनाव प्रचार पर असर दिखा। परिणाम का इंतजार है।